बेवडा मारून आलेल्या बाईकचालकाची पेट्रोलपंपावर धुलाई, पाच जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

दारू पिऊन तर्राट झालेल्या एका बाईकचालकाची पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी जाम धुलाई केली आहे.  मुंबईतील बोरिवली भागातील एचपी पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक केली असून, बेवडा मारून आलेल्या बाईकचालकाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी रात्री 8 च्या सुमारास पेरीयास्वामी हरिजन हा दारूच्या नशेत तर्रर्र होऊन बाईक चालवत या पेट्रोल पंपावर आला होता. पेट्रोल भरण्यासाठी तो रांगेत उभा होता. त्याच्या पुढे असलेल्या बाईकचालकाने पेट्रोल भरल्यानंतर कर्मचाऱ्यांना पैसे दिले. त्यातील उरलेले पैसे परत देण्यासाठी थोडा वेळ लागला. एक कर्मचारी पैसे सुट्टे करण्यासाठी गेल्याने हा वेळ लागला होता. पेरियास्वामी हा पेट्रोल भरण्यासाठी उशीर होत असल्याने वैतागला होता. त्याने वैतागून हॉर्न वाजवायला सुरुवात केली.  तिच्या कर्कश्य हॉर्न वाजवण्याने पेट्रोल पंपावरील कर्मचारी वैतागले होते.  त्यांनी पेरियास्वामीला हॉर्न वाजवून नको असं सांगितल्याने त्याने वाद घालायला सुरुवात केली.  पेरियास्वामीने एका कर्मचाऱ्यावर दगड उचलला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला, यामुळे त्याची 5 जणांनी मिळून  जाम धुलाई केली.

मार खाल्यानंतर पेरियास्वामीने पोलीस स्टेशन गाठलं आणि मारहाण झाल्याची तक्रार नोंदवली. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रथमेश जंजिरकर, अंकुश सिंग, जयेश पाष्टे, मंगेश पांचाळ, आदेश पेंजल यांना अटक करण्यात आली आहे.  मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  पोलिसांनी या 5 जणांना अटक करतानाच पेरियास्वामीविरोधातही गुन्हा नोंदवला आहे.  दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी त्याच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.