आपला माणूस – लोणारचे बुगदाणे सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

महाराष्ट्रातील एका नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार सरोवराचं जतन व्हावं हा बुगदाणे सरांचा ध्यास होता. जीवनध्येय होते. एखाद्या कार्याला वाहून घेतलेल्या अशा व्यक्ती दुर्मिळ असतात. लोणार सरोवराचं महत्त्व सांगणारे आणि त्याचे जतन-संवर्धन यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणारे बुगदाणे सर त्यापैकीच एक होते.

अमेरिकेतील ऑरिझोना राज्यात ‘बॅरिंजर’ नावाचे वाळवंटात तयार झालेले अशनी आघाती विवर आहे. या शुष्क विवराचे जतन त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने केलं आहे की, जगभरचे पर्यटक त्याकडे आकर्षित होतात. आपलं लोणार त्यापेक्षा कितीतरी मोठं आणि सुंदर वनश्रीने नटलेलं आहे. त्याचं जागतिक पर्यटनस्थळ झालं पाहिजे. इथलं पाणी, वनसंपदा याचं रक्षण आणि जतन करायला हवं’ असं बुगदाणे सर तिथे येणाऱया प्रत्येकाला अत्यंत तळमळीने सांगत.

बुलढाणा जिल्हय़ातील लोणारचे सरोवर हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे. पूर्वी ते देशभरात केवळ खाऱया पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध होते; परंतु आधुनिक काळातील वैज्ञानिक संशोधनातून ते ‘अशनी आघाता’ने निर्माण झालेले काळय़ा खडकातील सरोवर असल्याचे सिद्ध झाले. जगात ‘बेसॉल्ट रॉक’मध्ये तयार झालेले दुसरे अशनी-आघाती विवर अजून तरी सापडलेले नसल्याने ‘लोणार’ एकमेवाद्वितीय म्हणावे लागेल. या सरोवराचे हे अनन्यसाधारण महत्त्व जाणून त्याचे संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी गेली अनेक दशके अथक प्रयत्न करणारे सुधाकर बुगदाणे सर नुकतेच कालवश झाले. ‘लोणार’ तळय़ाच्या वैज्ञानिक आणि पर्यावरणीय जतनाचा त्यांनी अखेरपर्यंत ध्यास घेतला होता. अगदी महिन्या-दीड महिन्यापूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते आजारी असूनही ‘लोणार’साठी काहीतरी करा’ असे सांगत होते. आमच्या खगोल मंडळाने 1992पासून लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी अनेक कार्यक्रम केले. लोणारवर खगोलवार्ताचा विशेषांक आणि मराठी, इंग्रजी पुस्तकं प्रसिद्ध केली. 2002मध्ये दोन दिवसांनी लोणार परिषदही घेतली. ‘स्लाईड शो’च्या माध्यमातून आम्ही आपल्या महाराष्ट्रातील या जागतिक ठेव्याविषयी जनजागृती करत राहिलो. यासाठी आम्हाला आरंभी मार्गदर्शन लाभले ते बुगदाणे सरांचेच. 1992मध्ये आम्ही पहिल्यांदा ‘लोणार’ पाहायला गेलो तेव्हा तिथल्या शाळेत शिक्षक असलेले बुगदाणे सर भेटले. नुसते भेटलेच नाहीत तर सतत दोन दिवस आमच्याबरोबर फिरून लोणारच्या विशाल विवरात तळय़ापर्यंत 150 मीटर उतरून त्यांनी आम्हाला तिथे असलेले पर्यावरण समजावून सांगितले. तळय़ाकाठी असलेल्या अनेक देवळांची ऐतिहासिक माहिती दिली. या सरोवरापासून जवळच असलेल्या दैत्यसूदन मंदिरातील ‘लवणासूर’ राक्षसाचा वध विष्णू कसा करीत आहेत ते शिल्प दाखविताना त्यांनी पद्मपुरणातील त्याबद्दलची कथा सांगितली. विष्णूने ‘मी आघात रूपाने या राक्षसाचा निःपात करील’ असे वचन पृथ्वीला दिल्याचा त्यात उल्लेख आहे. मग लवणासूराचा ‘अरि’ म्हणजे शत्रू असलेल्या विष्णूच्या विजयानंतर तेथे ‘लवणारि’ हे नाव प्रसिद्ध होऊन त्याचे पुढे लोणार झाले का? याचीही चर्चा झाली. ‘लवण’ म्हणजे मीठ त्यामुळेच हे सरोवर खारे झाले. अर्थात या कथेबरोबरच ‘वैज्ञानिक’ दृष्टीने शोध घेताना अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या ‘स्मिथ्सॉनिअन इन्स्टिटय़ूट आणि आपल्या जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थांनी एकत्रितपणे केलेल्या उत्खननात सापडलेल्या ‘मॅस्केलनाईट’वरून हे सरोवर अशनी म्हणजे अवकाशात फिरणाऱया एका महापाषाणाच्या आघाताने 52 हजार वर्षांपूर्वी झाल्याचं सिद्ध झालं. हेसुद्धा बुगदाणे सरांनीच सांगितलं. 1972 ते 76 या काळात या सरोवराच्या मध्यभागी प्लॅटफॉर्म उभारून झालेल्या उत्खननाचे ते साक्षीदार होते. अग्निजन्य (बेसॉल्ट) खडकातील ‘पॅजिओक्लेज फेल्डस्पार’ या घटकाचे केवळ प्रचंड आघातानेच ‘मॅस्केलनाईट’मध्ये रूपांतर होऊ शकते आणि त्यावरूनच लोणारच्या सरोवराला जागतिक अशनी-आघात विवरांमध्ये स्थान मिळाले. हा सगळा तांत्रिक भागही बुगदाणे सर तिथे येणाऱया पर्यटकांना सोप्या शब्दात समजावून सांगत असत. ते याबाबतीत खऱया अर्थाने शिक्षकाची भूमिका पार पाडत. कोणाही पर्यटकाला सरोवर दाखवण्यासाठी अक्षरशः तहानभूक विसरून त्यांची पायपीट चालत असे. 1993मध्ये आम्ही या तळय़ाचं आणि तेथील दैत्यसुदन मंदिराचं या सर्वांचं चित्रीकरण केलं. बुगदाणे सरांच्या घरीच त्यांची एक मुलाखतही रेकॉर्ड केली. त्या काळी ‘व्हीएचएस’ कॅसेटवर केलेलं हे फिल्मिंग चांगल्या स्थितीत असेल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी लोणारचं प्राचीन नाव ‘विरज’ असं असल्याचंही बुगदाणे म्हणाले होते. त्यावरून आम्ही ‘विरज-विवर ः लोणार’ असा एक माहितीपटही बनवला होता.

लोणारचं हे महत्त्व जाणणारं आणि पर्यावरणविषयक जागरूकता असलेलं सरकार सुदैवाने आज महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या गडकिल्ल्यांच्या एरियल फोटोग्राफीच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ ‘लोणार’चंच आहे हा एक योगायोग आहे. अशा या अद्वितीय ठिकाणाची वैज्ञानिक महती जगाला सहजतेने समजावून देणारं म्युझियम (ऑरिझोनाप्रमाणेच) उभं राहिलं आणि सरोवराचं पर्यावरण सांभाळून ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालं तर महाराष्ट्राला भूषणावह होईल आणि बुगदाणे सरांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. लोणार आणि सराचं अद्वैत होतं. आता केव्हाही लोणारचा उल्लेख होताच पहिलं स्मरण होईल ते बुगदाणे सरांचंच!

– [email protected]