
मराठी अभिनेत्रीसह एकाला ऑनलाइन चुना लावणाऱया टोळीच्या साकीनाका पोलिसांनी राजस्थानात जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. बरकत शहाबुद्दीन आणि उन्नस कमरुद्दीन खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांच्या अटकेसाठी साकीनाका पोलिसांचे पथक आठ दिवस राजस्थानात फिल्डिंग लावून होते.
तक्रारदार या अभिनेत्री असून त्यांनी 2019 मध्ये ऑनलाइन वाईनची ऑर्डर केली होती. तेव्हा वाईन शॉप कर्मचाऱयाने बँक खात्याची माहिती काढून त्यांच्या बँक खात्यातील पैशांचा अपहार करून फसवणूक केली होती. त्यानंतर लष्करी अधिकारी असल्याचे भासवून एकाची ऑनलाइन फसवणूक केली होती. फसवणूकप्रकरणी साकीनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुनीता भोसले, पोलीस शिपाई संग्राम जगताप यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून आरोपीची माहिती काढली. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी साकीनाका पोलिसांचे पथक राजस्थानला गेले. साकीनाका पोलिसांचे पथक आठ दिवस राजस्थानला तळ ठोकून होते. अखेर पोलिसांनी बरकत आणि उन्नतला रामगड येथून ताब्यात घेतले.

































































