
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस पीकाची नोंद पारदर्शकणे होण्याकरीता उसाच्या ऑनलाईन नोंदीचा शुभारंभ नुकताच कराड येथील देसाई कारखान्याकडून पार पडला. प्रत्यक्ष शेतात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची धुरा सांभाळणारे यशराज देसाई यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी या कारखान्याचे प्रशासन आणि कारखान्यातील यंत्रसामुग्री यामध्येही अमुलाग्र बदल केला आहे.
यशराज देसाई यांनी कारखान्यातील सभासद शेतकरी यांच्याकडील उसाची नोंद करण्यासाठी बुद्रुक येथील शेतकरी विवेक सूर्यवंशी यांच्या ऊस क्षेत्राला भेट दिली. त्यावेळी शेती विभागातील कर्मचारी, सभासद, शेतकरी यांच्याकडील उसाची नोंद शुभारंभाच्या दिवशी केली.
यावेळी यशराज देसाई म्हणाले, कारखान्यामध्ये कमी खर्चाचे धोरण ठेवत पारदर्शक कारभार सुरू आहे. कारखान्याने उसाची आणि ऊस क्षेत्राची नोंद करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजे मोबाईल अॅपचा सुरू केले आहे. यामुळे ऊस तोडणी उपक्रम राबविताना अचूकता येणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील तसेच कार्यक्षेत्रातील ऊस नोंदीचा आणि अचूक क्षेत्राचा अंदाज येऊन पुढील गळीत हंगामाचे योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे.
या शुभारंभावेळी कारखान्याचे अध्यक्ष अशोक पाटील, कार्यकारी सुहास देसाई, विवेक सूर्यवंशी, दादासो जाधव, संतोष डोंगरे, जालिंदर डोंगरे, बाबुराव सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बाळासो सूर्यवंशी, संदीप पाटील उपस्थित होते.






























































