
अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. मात्र यावरून आता हे वादाचे कारण बनत असून काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे.
निधी संकलनावरून मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार कांतिलाल भूरिया यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप आणि काँग्रेस नेते आमनेसामने आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोक दिवसा राम मंदिरासाठी निधी गोळी करतात आणि रात्री दारू ढोसतात असे विधान, आमदार कांतिलाल भूरिया यांनी केले. यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टिकेचे आसूड ओढले आहेत. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, भाजप बऱ्याच काळापासून ‘मंदिर वही बनायेंगे’ असा नारा देत आहे. याआधीही मंदिराच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केले गेले आहेत. परंतु त्याचा हिशोब आजपर्यंत दिलेला नाही. आताही भाजपचे नेते, कार्यकर्ते घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलन करत आहेत. दिवसा हे निधी संकलन करतात आणि रात्री त्याचीच दारू पितात, परंतु बाता मात्र मंदिर उभारण्याच्या करतात, असे विधान आमदार कांतिलाल भूरिया यांनी केले आहे.
दरम्यान, काँग्रेस आमदाराच्या या वादग्रस्त विधानामुळे ते भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. मध्य प्रदेशचे प्रोटेम स्पिकर रामेश्वर शर्मा यांनी कांतिलाल भूरिया यांच्यावर टिका केली आहे. कांतिलाल भूरिया यांनी राम भक्तांना बदनाम करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच निधी संकलनाचा सर्व हिशोब ट्रस्टद्वारे ठेवण्यात येत आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही निधी दिला आहे, यावर त्यांचे काय म्हणणे आहे? असा सवालही त्यांनी कांतिलाल यांना केला.
याआधी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील निधी संकलनावर टिका केली होती. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून सदर पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठीच आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल याची खबरदारी घ्यावी. आजवर भाजपा-आरएसएस मार्फत गोळा केलेला निधी सदर ट्रस्टलाच भाजपा-आरएसएसने पोहोचवला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी करून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला होता.



























































