
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्या विरोधात गेल्या चाळीस दिवसां -पासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान संघर्ष समितीकडुन दाभोळकर कॉर्नर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्राने केलेला कृषि कायदा मागे घ्या यांसह मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.तर भविष्यात जीएसटी आणि आयकर भवनाला घेराव घालून सरकारची कोंडी करण्याचा इशारा स्वा.शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
दरम्यान आंदोलकांना ताब्यात घेताना पोलीस आणि आंदोलकांत मोठी झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला होता.आंदोलकांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक दबाव,आरोपांचे अडथळे आले तरी कडाक्याच्या थंडीतही गेल्या चाळीस दिवसां -पासून दिल्लीच्या सीमेंवर पंजाब,हरियानातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.केंद्र सरकार कडुन केवळ नावालाच बैठका होत असुन,चर्चेतून मार्ग निघत नाही.त्यात देशभरासह देशाबाहेरील विविध क्षेत्रातुनही या आंदोलनाला पाठिंबा देऊन, व्याप्ती वाढत आहे.
कोल्हापूरातुनही विविध पक्ष, संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.दिल्ली येथील आंदोलनात सहभागी सुद्धा झाले आहेत.आज पुन्हा एकदा दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने रास्तारोको करण्यात आला.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने,वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती.
पोलीसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला असता, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा -बाजी सुरु झाली.यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेताना,जोरदार झटापट झाल्याने एकच गोंधळ उडाला होता.पोलिस बंदोबस्तात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे नामदेव गावडे,उदय नारकर,सतीशचंद्र कांबळे,गिरीश फोंडे,रघुनाथ कांबळे,चंद्रकांत यादव,प्रशांत आंबी यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेवून, शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.तसेच तणाव निवळल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
एकदिवस तुमचे तुनतुने बंद पडायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टी यांचा सेलेब्रिटींना इशारा
अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या समर्थनार्थ सोशल मिडियातुन बाजू घेतली आहे.यावर राजू शेट्टी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहे.भलेही तुम्ही सरकारचे आश्रयदाते व लाभधारक असाल म्हणून सरकारला खुश करण्याच्या भानगडीत पडू नका. कोट्यावधी लोकांचे आपल्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला सेलिब्रिटी नावाची शेपूट लागली आहे.आता हेच कोट्यवधी लोक केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात आहेत. त्यामुळे तुम्ही या सर्वांच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारच्या समर्थनात बोलू नका,नाहीतर एकदिवस तुमचे तुनतुने बंद पडायला वेळ लागणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.






























































