मोटरमनच्या कॅबमध्ये कॅमेरे बसविणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उपनगरीय लोकलच्या मोटरमनच्या कॅबमध्ये आता रेकाॅर्डिंग करणारी कॅब क्रू व्हॉईस अॅण्ड व्हीडिओ रेकाॅर्डिंग यंत्रणा बसविण्यात येणार आहे. 2.8 कोटी रुपयांच्या या यंत्रणेला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून यामुळे मोटरमनच्या हालचालीवर नजर ठेवण्यात मदत होणार आहे. त्यामुळे मोटरमनकडून अचूक काम करवून घेणे सोपे होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

या कॅब क्रू व्हॉईस अॅण्ड व्हीडिओ रेकाॅर्डिंग यंत्रणेत एक कॅमेरा मोटरमनच्या दिशेने तर दुसरा रुळांच्या दिशेने बसविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या व्हॉईस रेकाॅर्डिंग करण्यासाठी मायक्रोफोनदेखील बसविण्यात येईल. या डिजिटल रेकाॅर्डिंगची क्षमता 90 दिवसांपर्यंत साठवून ठेवण्याची या यंत्रणेत आहे. हे कॅमेऱयांचे रेकाॅर्डिंग उच्च क्षमतेचे असून दूरपर्यंतचे दृश्य रेकाॅर्डिंग करण्याची त्यांची क्षमता आहे. पश्चिम रेल्वेच्या 110 लोकलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये अन्य रेल्वे कर्मचारीही प्रवास करीत असतात. त्यामुळे लोकल चालवताना मोटरमनचे लक्ष विचलित होऊ शकते. शिवाय लोकल चालवताना मोटरमनकडून मोबाईलवर बोलण्यास बंधने असून त्याचेही उल्लंघन होत असते. शिवाय गाडी चालवताना मोटरमनला काही शारीरिक समस्या उद्भवत तर नाही ना याची पडताळणी करणे सोपे होणार आहे. काही वेळा विनाकारण लोकल थांबविण्यात आल्यास किंवा रेड सिग्नल ओलांडल्यास अशा प्रकरणांची चौकशी करणे या आधुनिक यंत्रणेमुळे सोपे होणार आहे. तसेच मोटरमनच्या कॅबमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.