
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभागास (धोबीघाट) रविवारी सायंकाळी 4.30 ते 5 वाजेदरम्यान आग लागली. त्यामुळे रुग्णांसह परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सांयकाळी शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागास आग लागून मोठे नुकसान झाले होते. याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी समितीही स्थापन केली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरील मजल्यावर ठेवलेल्या साहित्यास शनिवारी रात्री मोठी आग लागली होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तातडीने अपघात विभागातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले होते. रात्रीच्या घटनेस अद्याप 24 तासही उलटले नाही तोच रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभागास मोठी आग लागली. या आगीत तेथील काही साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचार्यांसह नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे दीपक कानोडे, सर्जेराव मुंडे, इनायत अली, वसीम अखील अहेमद, पंढरीनाथ कालाने, जलील अहेमद खान आदींनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दोन दिवसात लागलेल्या दोन विभागातील आगीच्या या घटनेमुळे शासकीय रुग्णालय व परिसरात खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगीनंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यासह प्रशासनातील अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
आगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन
शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरील मजल्यावरील जिन्यात ठेवलेल्या साहित्यास आग लागली होती. याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती रविवारी स्थापन केली होती. तीन दिवसात समितीने चौकशी अहवाल सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. या समितीत उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, महापालिकेचे उपायुक्त गायकवाड यांची सदस्य म्हणून तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.






























































