चंदनाची तस्करी करणारे तिघे जेरबंद, गुन्हे शाखेची मोहोळमध्ये कारवाई म्होरक्या फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदनाची तस्करी करणाऱया टोळीतील तीन चंदनतस्करांना सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, या टोळीचा म्होरक्या मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बिनू दाढे (रा. वाफळे, ता. मोहोळ) या म्होरक्यासह रमेश अप्पराव चवरे (रा. पेनूर, ता. मोहोळ), लंकेश्वर अभिमान काळे, अमोल अशोक काळे (दोघेही रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी या पथकाला मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेनूर शिवरातील नागनाथ मंदिराजवळ बेकायदेशीर चंदनाची खरेदी-विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी रमेश चवरे हा लंकेश्वर आणि अमोल यांच्याकडून चंदनाची लाकडे खरेदी करताना सापडला.

पोलीस पथकाने गराडा घालून तिघांना ताब्यात घेतले असता, हे चोरलेले चंदन टोळीचा म्होरक्या बिनू दाढे याच्याकडे नेले जाणार असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे दोन लाख 34 हजार रुपये किमतीचे 23 किलो 400 ग्रॅम सुगंधी चंदन, 50 हजार रुपये किमतीची दुचाकी, तीन हजार रुपये किमतीचे वजनकाटा व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 85 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत वरील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, रमेश, लंकेश्वर आणि अमोल या तिघांना अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या बिनू दाढे याचा मोहोळ पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यापूर्वी अतिशय गरीब वाटणाऱया बिनू दाढे याच्या शेतातून सुमारे 45 लाखांचे चंदन पोलिसांनी पकडले होते.

सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार मोहम्मद मुजावर, हेड कॉन्स्टेबल नारायण गोलेकर, धनाजी गाडे, अक्षय दळवी, धनराज गायकवाड, समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.