
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी हडपसर परिसरातून 10 लाख रुपये किमतीचा तब्बल 52 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन आणि मुद्देमाल असा एकूण 18 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अण्णा मोहन जाधव (वय 26, रा कोलवाडी, ता.हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना स्मशानभूमी जवळील एका रस्त्यावर मोटार संशयास्पदरित्या फिरताना दिसून आली. पथकाने गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये 52 किलो गांजा आढळला. त्यानंतर पोलिसांनी मोटार चालक अण्णा जाधव याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने स्वतःचा भाऊ सागर जाधव याने हा गांजा विक्री करण्यासाठी दिला असल्याची कबुली दिली.
दोन्ही भावांविरोधात एनडीपीए कलमनुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, संदीप जाधव, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, राहूल जोशी, रूबी अब्राहम, मारूती पारधी, मनोज साळुंखे, प्रवीण उत्तेकर, नितीन जाधव, रिहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

























































