
‘हय ती मैत्री रे मिया नाय तोडूचय…तोडलय तर आवशीचान तुजी साथ नाय सोडूचय’, ’तुज्या सारखो मित्र रे खय हा…तुजो माजो दोस्ताना’ बॉलीवूडच्या लोकप्रिय हिंदी गाण्यांचे हे मालवणी व्हर्जन सध्या सोशल मीडियावर धुमशान घालतंय. लॉकडाऊनमधल्या फावल्या वेळेत गायक-संगीतकार प्रणय दरेकर यांनी केलेल्या या अनोख्या प्रयोगाचे सर्कत्र कौतुक होतंय. लककरच त्यांचे 75 के गाणे नेटिझन्सच्या भेटीला येणार आहे. मार्चपर्यंत 100 गाणी पूर्ण करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
प्रणय दरेकर हे मूळचे पोलादपूरचे. मच्छिंद्र कांबळी यांच्या ’वस्त्रहरण’ या नाटकामुळे त्यांची मालवणी भाषेशी नाळ जुळली. ’नाय नो नेव्हर’,’लगे रहो राजाभाई’ सारख्या अनेक नाटकांसाठी त्यांनी संगीत संयोजन केलंय. त्यांनी संगीतबद्ध केलेले ’यदा कदाचित रिटर्न्स’ हे नाटक रंगभूमीवर सुरु होते, लॉकडाऊनमध्ये फावल्या वेळेत त्यांनी हिंदीतील लोकप्रिय गाण्यांना मालवणी चाल देण्याचा प्रयोग केला. ही गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अन् त्यांच्या ’शिमगो गाण्याचो नी धयकालो मालवणचो’ या फेसबुक पेजचे फॉलोअर्स झपाटय़ाने वाढले.
पुढच्या महिन्यात ‘शिमगो गाण्याचो’
प्रणय यांची निवडक गाणी आता ’शिमगो गाण्याचो नी धयकालो मालवणचो’ या कार्यक्रमाच्या रूपातून प्रेक्षकांना पुढच्या महिन्यापासून रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना, गीते प्रणय यांचीच असून गायनात त्यांना वैभवी कदम साथ देतील. संगीत संयोजन प्रशांत कदम यांचे आहे. ’रात्रीस खेळ चाले 2’ फेम मिताली साळगावकर, अभिनेता-दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर, सचिन वळंजू, अर्चना परब आणि सानिका परब यांचे अस्सल मालवणी स्कीट कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे.






























































