
जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या महसूल जत्रेअंतर्गत सामोपचाराने व लोकसहभागातून शेत रस्ते अतिक्रमणमुक्त होत आहेत. बुधवारी एकाच दिवशी भुदरगड तालुक्यातील 53 गावांतील 61.980, तर आजरा तालुक्यातील 52 गावांतील 66.700 कि. मी. लांबीचे रस्ते खुले करण्यास सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जेसीबी चालकास सूचना देत, भुदरगड तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील कामत पाणंद हा 2.5 कि. मी. रस्ता खुला करण्याचा शुभारंभ केला. भुदरगड तालुक्यातील 3,344 तसेच आजरा तालुक्यातील 2,715 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. गाव शिवारातील प्रलंबित आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सामोपचार आणि लोकसहभागाने वाट मोकळी करून देण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या महसूल जत्रेअंतर्गत पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त होण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी वरुटे, जि. प. सदस्य रोहिणी आबिटकर, सरपंच विश्वनाथ कुंभार, उदय मिसाळ, मंडळ अधिकारी रामदास लांब, तलाठी दयानंद कांबळे, ग्रामसेवक बोडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


























































