शक्ती, करिश्माची डरकाळी, पेंग्विनच्या गमती पाहता येणार, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान गजबजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेले 10 महिने बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सोमवारपासून पुन्हा पर्यटकांनी गजबजणार असून एरव्ही जंगलात पाहायला मिळणाऱया प्राण्यांना आता बच्चे कंपनीसह मोठय़ांनाही थेट भेटता येणार आहे. शक्ती आणि करिश्मा या वाघांच्या नर-मादी जोडीच्या डरकाळ्या अनुभवता येणार असून सोबत पेंग्विनच्या पाण्यात सूर मारण्याच्या गमतीजमती अगदी जवळून पाहता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व खबरदारी घेऊन हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हे उद्यान सुरू करण्याला परवानगी दिली आहे. दरम्यान, प्राणिसंग्रहालयात पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली असून 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न दररोज एक लाखापासून सहा लाखांपर्यंत गेले आहे. यामध्ये सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख आणि महिना सरासरी 45 लाखांवर गेले आहे. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बंद असल्याने प्रतिदिवस दीड लाखाचा महसूल बुडत होता. मात्र आता हे प्राणिसंग्रहालय सुरू होत असल्यामुळे पालिकेला बुडणारा महसूल मिळणार आहे. प्राणिसंग्रहालयाला नियमितपणे पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या 15 हजारांपर्यंत जाते.

सध्या पक्ष्यांना पाहता येणार नाही

पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण केल्यानंतर आणलेल्या वाघ, चित्ता, तरस, कोल्हा अशा प्राण्यांसाठी नैसर्गिक स्वरूपाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्राणी पर्यटकांना जवळून पाहता यावेत यासाठी काचेच्या मोठमोठय़ा तावदानांची व्यवस्था आहे. त्याचबरोबर देशीविदेशी पक्षी आणि त्यांच्यासाठी नवीन पिंजरेही तयार करण्यात आले आहेत. मात्र या पिंजऱयांच्या आतून वॉकथ्रू असल्यामुळे पर्यटकांचा पक्ष्यांबरोबर संपर्क येऊ नये, यासाठी सध्या हे पक्षी पर्यटकांना पाहता येणार नाही, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.