
आटोक्यात आलेल्या कोरोनाने गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह राज्यभरात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सोमवारी एकाच दिवसात राज्यात 3 हजार 365 नवे कोरोनाबाधित आढळले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्थितीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट संकेत दिले असून उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.
कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारसह मुंबई महानगरपालिकेने प्रभावी उपाययोजना केल्यामुळे कोरोना चांगलाच आटोक्यात आला. मात्र मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकल सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनंतर रुग्णसंख्या काहीशी वाढू लागली आहे. 2 फेब्रुवारीला मुंबईत 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता चारशे, साडेचारशे, पाचशे तर पावणे सहाशेपर्यंत नोंदवला जात आहे. राज्यातही हीच स्थिती असून 11 फेब्रुवारीला 3297 असणारी रुग्णसंख्या 12 फेब्रुवारीला 3670, 13 फेब्रुवारीला 3611 आणि 14 फेब्रुवारीला एकाच दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 491 ने वाढून थेट 4092 इतकी नोंदवली गेली. 11 फेब्रुवारीच्या तुलनेत 14 फेब्रुवारीपर्यंत केवळ तीन दिवसांत 795 ची वाढ झाली.
मुंबईत 493 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासांत 493 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 566 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे मुंबईत आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 14 हजार 569 झाली असून मृतांचा आकडा 11420 झाला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱयांचा आकडा 2 लाख 96 हजार 761 वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत मुंबईत 5531 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत सतर्पता
- मुंबईतही कोरोना नियंत्रणात आला असला तरी गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्या काहीशी वाढत आहे. 8 फेब्रुवारीला 399, 9 फेब्रुवारीला 375 असणारी रुग्णसंख्या 10 फेब्रुवारीला 558 तर 11 फेब्रुवारीला 510 नोंदवली गेली. ही वाढ कायम असून 14 फेब्रुवारीला वाढत जाऊन 645 इतकी नोंदवली गेली आहे. म्हणजेच तीन दिवसांत 135 ची वाढ झाली आहे.
- रुग्णवाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आणखी सतर्प झाली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या 18 हजारपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. केरळमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रवासी कोरोना निगेटिव्ह असले तरी सात दिवसांचे हॉटेलमध्ये सक्तीचे क्वारेंटाइन केले जात आहे.
राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता लावणार
सध्या विनामास्क फिरणाऱयांची संख्या मोठी आहे. ही बाब अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. यासंदर्भात आपण मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. या बैठकीत कोरोनासंदर्भात कदाचित
कठोर निर्णय घेतले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठीही नियमावली लागू केली पाहिजे. याबाबतही आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
नियम पाळा, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट लॉकडाऊनचेच संकेत दिले आहेत. जनतेने नियम पाळणे आवश्यक आहे, नाहीतर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठरेल आणि जनतेच्या हितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत असताना कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आरोग्य खात्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई व विदर्भात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नियम पाळावेच लागतील, असे टोपे म्हणाले.































































