शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गजानन मारणेसह 10 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gajanan-marane

कारागृहातून सुटल्यानंतर  अलिशान वाहनांतून मिरवणूक काढणार्‍या गजानन मारणे याच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. तळेगाव दाभाडे, कोथरूडनंतर आता वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना कालावधीत जमावबंदीचे आदेश झुगारून तोंडाला मास्क न लावता सुरक्षित अंतर न ठेवल्याप्रकरणी त्याच्यासह 10 जणांविरूद्ध  शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.

गजा उर्फ गजानन मारणे, प्रदीप कंधारे, बापू बागल, अनंता कदम, गणेश हुडारे, रुपेश मारणे, रुपेश बनसोडे, श्रीकांत पवार, सचिन ताकवले, संतोष शेलार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने  निर्दोष मुक्तता केल्यानंतर गजनान मारणे सोमवारी तळोजा कारागृहातून  बाहेर आला होता. त्यानंतर समर्थकांनी त्याची तळोजा ते पुणे मार्गावर शेकडो वाहनातून मिरवणूक काढली.

त्यामुळे त्याच्याविरूद्ध तळेगाव दाभाडे  आणि कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार  त्याला अटक करण्यात आली. त्याची काल जामिनावर सुटका झाली. त्यानंतर लगेच गजानन मारणेसह 10 जणांविरूद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने सहायक पोलीस निरीक्षकाला दिले ढकलून

सोमवारी रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे पोलिस गुन्ह्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गजानन मारणेसह साथीदारांनी वाहनातून चांदणी चौकात विना मास्क मिरवणूक काढली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना परवागनीची विचारणा केली असता, आरोपी संतोष शेलार याने  हाताने सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांना ढकलून दिले.