हिंदुस्थानने घेतली इंग्लंडची फिरकी, पाहुण्यांचा पहिला डाव 112 धावांत गारद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात मोठय़ा अहमदाबाद येथील स्टेडियमवर सुरू झालेल्या तिसऱया दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान हिंदुस्थानने पहिल्याच दिवशी इंग्लंडची फिरकी घेतली. कारकिर्दीत दुसरीच कसोटी खेळत असलेला लोकल बॉय अक्षर पटेलने बळींचा षटकार लगावत पाहुण्यांचा पहिला डाव अवघ्या 48.4 षटकांत 112 धावांवर गारद केला. शंभरावी कसोटी खेळणाऱया इशांत शर्माने तिसऱयाच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंडची दाणादाण उडाली. प्रत्युत्तरादाखल शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हिंदुस्थानने पहिल्या डावात 8 षटकांत बिनबाद 10 धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा 10 धावांवर खेळत होता, तर शुभमन गिल शून्यावर त्याला साथ देत होता.

अक्षर, अश्विनपुढे लोटांगण

कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळणाऱया इशांत शर्माने तिसऱयाच षटकात डॉम सिबलीला शून्यावर रोहितकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. कर्णधार विराट कोहलीने सातव्याच षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला मोर्चावर आणले. या लोकल बॉयने पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला शून्यावर पायचित करून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. दुसरा सलामीवीर झॅक क्राउलीने फलंदाजीला आलेल्या जो रुटच्या साथीने तिसऱया विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. विराटने ही जोडी फोडण्यासाठी रविचंद्रन अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. अश्विनने दुसऱयाच षटकात धोकादायक रूटला (17) पायचित करून कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला.

अर्धशतकानंतर क्राउली माघारी

जो रुट बाद झाल्यानंतर एका बाजूने किल्ला लढवणारा झॅक क्राउलीनेही संयम गमावला. 84 चेंडूंत 10 चौकारांसह 53 धावा करणाऱया या सलामीवीराला अक्षर पटेलने पायचित केले. मग आलेल्या बेन स्टोक्सलाही (6) पायचित करून अक्षर पटेलने इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडले. तळाला बेन फोक्स (12) व आर्चर (11) यांनी दुहेरी धावा केल्या म्हणून इंग्लंडला किमान धावांची शंभरी ओलांडता आली. हिंदुस्थानकडून अक्षर पटेलने 38 धावांत 6 फलंदाज तंबूत धाडले, तर रविचंद्रन अश्विननेही 3 गडी बाद केले. इशांत शर्माला एक बळी मिळाला.

इशांतचा विचित्र विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया कसोटीत हिंदुस्थानचा 32 वर्षीय इशांत शर्मा कपिलदेवनंतर शंभर कसोटी सामने खेळणारा हिंदुस्थानचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरला. मात्र यात आणखी एका विचित्र विक्रमाची भर पडली. कारण आतापर्यंतच्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकही वर्ल्डकप न खेळता शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत हा जगातील पाचवा क्रिकेटपटू ठरलाय. याआधी, ऍलेस्टर कुक (इंग्लंड), व्हीव्हीएस लक्ष्मण (हिंदुस्थान), कोलीन काऊड्रे (इंग्लंड), जस्टीन लँगर (ऑस्ट्रेलिया) हे क्रिकेटपटू शंभरहून अधिक कसोटी सामने खेळले. पण त्यांना एकदाही वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता या विचित्र विक्रमात इशांत शर्माचीही भर पडली आहे.

‘टीम इंडिया’त दोन, इंग्लंड संघात चार बदल

तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यासाठी ‘टीम इंडिया’त दोन बदल करण्यात आले. फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागेवर जसप्रीत बुमराह यांना अंतिम अकरात स्थान देण्यात आले. इंग्लंडच्या संघातही चार बदल करण्यात आले. रोरी बर्न्स, डॅन लॉरेन्स, ओली स्टोन व मोईन अली यांना वगळून जेम्स ऍण्डरसन, आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि झॅक क्राऊली यांचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्यात आला आहे.

फलंदाजीचा निर्णय अंगलट

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. हिंदुस्थानच्या फिरकी जोडगोळीने त्यांच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. केवळ सलामीवीर झॅक क्राउलीने (53) अर्धशतकी खेळी करीत हिंदुस्थानी गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार केला. इंग्लंडचे इतर फलंदाज केवळ हजेरीवीर ठरले.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव – झॅक क्राउली पायचित गो. अक्षर 53, डॉम सिबली झे. रोहित गो. इशांत 0, जॉनी बेअरस्टो पायचित गो. अक्षर 0, जो रुट पायचित गो. अश्विन 17, बेन स्टोक्स पायचित गो. अक्षर 6, ओली पोप त्रि.गो. अश्विन 1, बेन फोक्स त्रि.गो. अक्षर 12, आर्चर त्रिफळा गो. अक्षर 11, जॅक लिच झे. पुजारा गो. अश्विन 3, स्टुअर्ट ब्रॉड झे. बुमराह गो. अक्षर 3, जेम्स ऍण्डरसन नाबाद 0.

अवांतर – 6
एकूण – 48.4 षटकांत 112 धावा.
बाद क्रम – 1-2, 2-27, 3-74, 4-80, 5-81, 6-81, 7-93, 8-98, 9-105, 10-112.

गोलंदाजी 

इशांत शर्मा 5-1-26-1,
जसप्रीत बुमराह 6-3-19-0,
अक्षर पटेल 21.4-6-38-6, रविचंद्रन अश्विन 16-6-26-3.