रुग्णवाढ असूनही एका दिवसात 700 सील इमारती झाल्या खुल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून होणारी रुग्णवाढ कायम असून गेले सलग तीन दिवस एक हजाराहून रुग्ण आढळले असताना सील इमारतींची संख्या मात्र एकाच दिवसांत 700 ने कमी झाल्याचे समोर आले आहे. 24 फेब्रुवारी रोजी 815 सील इमारतींची संख्या 25 फेब्रुवारीला थेट 126 वर तर 26 फेब्रुवारीला 120 पर्यंत खाली आल्याचे पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

मुंबईत पूर्णपणे आटोक्यात आलेला कोरोना वाढू लागल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या इमारतीत 5 रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याआधी 10 रुग्ण आढळल्यानंतर इमारत सील करण्यात येत होती. त्यामुळे आठवडाभरापूर्वी केवळ दोन दिवसांत सील इमारतींची संख्या तब्बल एक हजाराने वाढली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एक हजारावर रुग्ण नोंदवले जात असताना सील इमारतींची संख्या झपाटय़ाने कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शुक्रवारची रुग्णसंख्या

राज्य – 8333
मृत्यू – 48
मुंबई – 1034
मृत्यू – 3

प्रशासन म्हणते…

रुग्ण वाढत असताना सील इमारतींची संख्या घटल्याबाबत प्रशासनाला विचारले असता गेल्या दोन दिवसांत मजले आणि इमारतीच्या भागांची आकडेवारी नोंदवली गेली नसावी अशी माहिती देण्यात आली.