
डोंगर– दऱ्या, बर्फातील नागरिकांचे जीवन सहजसोपे व्हावे, यासाठी लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक सोनम कांगचुक नवनवीन आविष्कार शोधत असतात. नुकतंच त्यांनी जवानांसाठी उबदार सौरतंबू तयार करण्याची किमया साधली होती. त्यानंतर कांगचुक आता बर्फातून रस्ता (आईस टनेल) खोदण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाकर काम करत आहेत. श्रीनगर- लेह महामार्गावर वर्षाचे बारा महिने वाहतूक सुरळीत रहावी, यासाठीच त्यांनी बर्फातल्या टनेलचे काम सुरू केले आहे.
सोनम कांगचुक यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओतून त्यांनी जोजिला येथे बांधण्यात येणाऱ्या 14. 15 किलोमीटर लांबीच्या बर्फाच्या टनेलची माहिती दिली आहे. कांगचुक म्हणाले, बर्फामुळे टनेल बांधताना अनेक अडचणी येऊ शकतात. बर्फाची वादळे किंवा हिमस्खलन होऊ शकते. त्यामुळे सरकारने मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ आणि मशीन उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यासंदर्भात कांगचुक यांनी नॅशनल हायके ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केलेले आहे.
पैसे आणि पर्यावरणाचे रक्षण
सोनम कांगचुक यांनी शुक्रवारी जोजिला भागात जाऊन परिसराची पाहणी केली. पर्यावरण रक्षणाच्या आणि आर्थिकदृष्टय़ा बर्फाचे टनेल फायदेशीर असल्याचे कांगचुक यांनी सांगितले. कारण त्यामुळे दरवर्षी 500 टन कार्बनडायॉक्साईड आणि कोटय़कधी रुपयांची बचत होऊ शकते.
























































