
सरकार येते सरकार जाते…कोणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, पण आपण आता सत्तेत नाही हे काही लोकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी टोलेबाजी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला.
या अधिवेशनात अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेताना भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिने का वक्त है…हमारा वक्त फिरसे आयेगा असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जेव्हा जेव्हा बोलण्याची संधी मिळते तेव्हा प्रत्येक वेळेस हे बोलतात राज्य सरकार बरखास्त होणार, राष्ट्रपती राजवट येणार, काही महिन्यांनी आम्ही सत्तेवर येणार असे सतत वक्तव्य करीत असतात. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, देवेंद्रजी यांना पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. आपण एकमेकांना इतकी वर्षे ओळखतो आहोत, पण अशी अवस्था पाहिली नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण यावेळेस सरकारमध्ये नाही हे शल्य बोचत असल्याचा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, काहींच्या डोळ्यांत यायचे लागले की काय होते ते पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी एकनाथ खडसे यांचे उदाहरण दिले. एकनाथ खडसे यांची काय अवस्था केली ते सांगायला नको. त्यानंतर काही लोकांना वाटले की, खडसे साहेबांपर्यंतच झाले आता आपण वाचलो, असा चिमटा त्यांनी काढला.
क्या गम है छुपा रहे हो
सुधीर मुनगंटीवार यांनी बजेटच्या भाषणात विदर्भाच्या मुद्दय़ावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही टोला लगावला होता. त्याचा समाचार अनिल देशमुख यांनी घेतला.सुधीरभाऊ, तुम्ही एवढे सीनियर आहात पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तुमच्या मनातले दुःख मी समजू शकतो. तुमचा नंबर लागला नाही असे मी तुम्हाला बोललो, तरी खोटं हसून तुम्ही वेळ मारून नेली. याची आठवण अनिल देशमुख यांनी करून देत मुनगंटीवार यांना उद्देशून जगजित सिंह यांची गझल सभागृहात ऐकवली. तुम इतना क्यो मुस्कुरा रहे हो… क्या गम है तुम छुपा रहे हो… आँखो मे नमी… हसी लबों पर…क्या हाल है.. क्या दिखा रहे हो… अशी तुमची हालत होती, असे अनिल देशमुख यांनी सांगताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला.































































