सर्वेक्षण संपले; आकडेवारी अस्पष्ट, राज्यात किती विद्यार्थी शाळाबाह्य?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 मार्चपासून सुरू झालेले शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण काल 10 मार्चला संपले असले तर शालेय शिक्षण विभागाने सर्वेक्षणात किती मुले शाळाबाह्य सापडली याची आकडेवारी जाहीर केलेली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सर्व्हे नीट झाला नसल्यामुळे पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी या क्षेत्रात काम करणाऱया स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

राज्यातील अनेक जिह्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढल्यामुळे  मुंबईसह सोलापूर, हिंगोली, संभाजीनगर, जालना, ठाणे, अमरावती, वर्धा, अकोला (शहरी), पुणे, वाशीम आदी जिल्हे वगळून इतर जिह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. यात किती शाळाबाह्य विद्यार्थी सापडले याची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना किमान विचारात घ्यावे, अशी मागणी शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

सर्वेक्षण नीट झाले नाही ही वस्तुस्थिती शिक्षण विभागाने मान्य करून स्वयंसेवी संस्थांसोबत जिल्हानिहाय बैठका कराव्यात व पुन्हा नीट नियोजन करून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वेक्षण करावे अशी सूचनाही नोडल पर्सन स्वयंसेवी संस्था व सर्वेक्षण समिती, एकलव्य पुणे, सर्वहारा जनआंदोलन रायगड, शांतिवन बीड, श्रमिक मुक्ती संघटना मुरबाड, लोकसंघर्ष मोर्चा नंदुरबार, श्रमिक एल्गार चंद्रपूर, स्वप्नभूमी परभणी, संतुलन पुणे, अवनि कोल्हापूर, संघर्षवाहिनी नागपूर, संकल्प  मानव विकास संस्था परभणी, syscom संस्था पुणे, RTE फोरम महाराष्ट्र, कलापंढरी संस्था लातूर, बालविवाहविरोधी कृती समिती, समर्थन या संस्थांनी केले आहे.