सिद्धार्थ जाधव झाला भावूक, सोशल मीडियावर शेअर केला आयुष्यातील सर्वात सुंदर फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा कायम त्याच्या विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र दिलखुलास वागणाऱ्या या अभिनेत्याने नुकताच त्याच्या मनातील एका कप्प्यात लपलेल्या भावनांना वाट करून दिली. सिद्धार्थाने एका लहान मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा मुलगा अत्यंत साध्या घरातील दिसत आहे. त्या मुलाला पाहून सिद्धार्थला त्याच्या बालपणीची आठवण झाली. प्रतिकूल परिस्थितीतून मराठी सुपरस्टार असा त्याचा हा त्याचा खडतर प्रवास त्या फोटोतून चाहत्यांना सहज पाहायला मिळत आहे.

त्या फोटोत सिद्धार्थ व तो लहान मुलगा बाजूबाजूला बसले आहेत हा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत सोबत एक भावनिक पोस्ट लिहली आहे. ”माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर फोटो. मी आणि माझं “बालपण”. आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो.. पण… बोललो काहीच नाही. अनुभवलं… एकमेकांना. तेजर नेरुरकर, मित्रा मी तुझा मनापासून आभारी आहे.. आज माझ्या सिध्दूला तू मला भेटवलस. आई, पप्पा, दादा , पिंकी.. लव्ह यू खुप…” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रीया देत त्याच्यातील साधेपणाची तारिफ केली आहे. ‘सेलिब्रिटी होऊनही तू तुझ्या भुतकाळातला साधेपणा बिनधास्त जगाला दाखवलास’ ‘यशाचा शिखरावर असतांना सुद्धा पाय मात्र जमिनीवर असलेला अभिनेता’. अशा शब्दात चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.