
जागेच्या वादातून तरूणाला टायरखाली ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आंबेगाव खुर्दमधील जांभुळवाडी रस्त्यावर नुकतीच घडली. हनुमंत शिवराम लिबोरे, सागर गुलाब कोंढरे, प्रकाश थोरात, सागर पवार, सुधीर गुलाब कोंढरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रदीप रामराव पाटील (वय 36, रा. आंबेगाव खुर्द ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप आणि आरोपींचे जागेवरून वाद सुरू आहेत. 1 मार्चला आरोपी प्रदीप यांच्या जागेत जेसीबी मशीन घेउन आले. त्यांची भिंत पाडून आरोपींनी प्रदीप यांना शिवीगाळ केली. जेसीबी मशीनच्या बकेटने धक्का देउन त्यांना टायरखाली ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत आहेत.


























































