नगर शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर महापालिका क्षेत्रात बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणी शनिवार 13 ते 26 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.

सावेडी उपनगरातील बोल्हेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या भागात मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. या झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत; तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या ठिकाणी प्रशासनातर्फे कंट्रोल रूम्स स्थापन करून ती 24 तास कार्यरत ठेवली जाणार आहे. त्यामध्ये 3 ते 4 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करून प्रत्येक शिफ्टमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या झोनसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिका उपायुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या परिसरात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून तातडीची वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच ये-जा करणाऱ्या व्यक्तींची थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

कंट्रोल रूममध्ये रजिस्टर ठेवून त्यात नोंदी घेण्यात येणार आहेत व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सशुल्क पुरविल्या जाणार आहेत. या क्षेत्रातील रहिवाशांना आवश्यक असणारे दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी शुल्क आकारून महापालिका यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहेत. तसेच सर्व बँकांनी नागरिकांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या क्षेत्रातील सर्व पर्यायी रस्ते पत्रे तसेच बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.

हे आहेत कंटेन्मेंट झोन

– मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 – बोल्हेगाव परिसरातील मनोलीलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांचे घर हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन आहे.

– मायक्रो कंटेन्मेंट झोन 2 – बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत.

– मायक्रो कंटेन्मेंट झोन 3 – बोल्हेगाव परिसरातील गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदी कैलास बी इमारत.