
हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानची टी-20 क्रिकेट मालिका म्हणजे टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याने नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. इशान किशनने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकून ती झलक दाखवली आहे. हिंदुस्थान- इंग्लंड दरम्यानचा तिसरा सामना मंगळवारी रंगणार आहे. त्यामुळे इशानसह सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर हे नव्या दमाचे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.
उभय संघ खालीलप्रमाणे –
हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांडय़ा, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, इशान किशन.
इंग्लंड – ओएन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रिस टॉपले, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम करण, टॉम करण, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो, जोप्रा आर्चर.
मार्क वूडमुळे इंग्लंडची ताकद वाढणार
मार्क वूडच्या गैरहजेरीत दुसऱया टी-20 सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजीची धार कमी झालेली दिसली. मात्र हा वेगवान गोलंदाज तिसऱया लढतीत खेळणार असल्याने इंग्लंडची ताकद वाढणार आहे. इंग्लंडकडे कर्णधार ओएन मॉर्गनसह जेसन रॉय, जोस बटलर, बेन स्टोक्स व डेविड मलान असा आक्रमक फलंदाजीक्रम आहे. त्यामुळे इंग्लंडचा समतोल संघ पलटवार करण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल, यात वादच नाही.
रोहितला संधी मिळण्याची शक्यता
हिंदुस्थानी संघासाठी रोहित शर्मा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून त्याला पहिल्या दोन लढतींत बाकावर बसवले. मात्र लोकेश राहुल सलग दोन लढतींत अपयशी ठरल्याने रोहितला तिसऱया लढतीत खेळविण्याची शक्यता बळावली आहे. इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं. आता सूर्यकुमार यादवचे हात शिवशिवत असतील. वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांना अष्टपैलूत्व सिद्ध करावं लागणार आहे. रिषभ पंत व हार्दिक पांडय़ा यांची तुफानी फलंदाजी पाहण्यासाठीही क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. कर्णधार विराट कोहली फॉर्मात परतल्याने इंग्लंडची धाकधूक नक्कीच वाढलेली असणार.
तिसरी टी-20 लढत
हिंदुस्थान – इंग्लंड
सायंकाळी 7 वाजता





























































