माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनाने दिल्लीत निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी (वय 70) यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच जिह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी सरोज, देवेंद्र व माजी नगरसेवक सुवेंद्र ही दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले होते. तिथे दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाले. दरम्यान, गांधी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती स्वानंद नवसारीकर यांनी दिली.

1985 ते 1999 पर्यंत त्यांनी नगर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1999 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. या कार्यकाळात 2000 ते 2004 ग्रामीण विकास समिती आणि 2000 ते 2003 पर्यंत वित्त मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. 2009 मध्ये दुसऱयांदा ते लोकसभेत निवडून गेले. तर, 2014 मध्ये तिसऱयांदा लोकसभेवर निवडून आले होते. 2003 ते 2004 या काळात केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते.