विकासकामांतील 486 झाडांच्या बदल्यात दुप्पट झाडे लावणार!वृक्ष प्राधिकरण समितीत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील विविध विकासकामांसाठी 486 झाडे तोडण्यात येणार असून त्याच्या बदल्यात दुप्पट म्हणजेच तब्बल 972 झाडे लावण्यात येणार आहेत. याबाबत आज वृक्ष प्राधिकरणात मांडलेल्या 13 प्रस्तावांना मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

मुंबईतील कोणत्याही विकासकामांमध्ये झाडे तोडावी लागत असल्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेणे अनिवार्य असते. याबाबत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत हे प्रस्ताव मांडण्याच्या आधी उद्यान विभागाकडून जाहिरात देऊन नागरिकांकडून हरकती सूचनाही मागवल्या जातात. यानंतर पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चा झाल्यानंतर मंजुरी देण्यात येते.

यावेळी जास्तीत जास्त झाडे वाचवणे, झाडे न कापता पुनर्रोपित करण्याला प्राधान्य दिले जाते. यानुसार आज झालेल्या बैठकीत विविध प्रकल्पांचे एकूण 24 प्रस्ताव मांडण्यात आले. यातील 13 प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर 11 प्रस्ताव फेरविचारार्थ परत पाठवण्यात आले. या 13 प्रस्तावांतील 2914 झाडांसंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आले. यातील तोडाव्या लागणाऱया 486 झाडांच्या बदल्यात दुप्पट झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.