
राज्यात लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पण सध्या कठोर निर्बंध करण्याची तयारी सुरू आहे. गरज पडल्यास कठोर पावले उचलली जातील. लोकांनी त्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले.
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व लॉकडाऊनची चर्चा या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेडचा तुटवडा जाणवत आहे. मात्र सर्व जिह्यांत परिस्थिती सारखी नाही. काही ठरावीक भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी खाटा मिळण्यात अडचणी येत आहेत. मुंबईत आयसीयूचे चारशे बेडस् आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या दोन हजार आहे. व्हेंटिलेटर बेड पुरेसे आहेत. राज्यातील इतर जिह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे, असे टोपे म्हणाले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खाटा अपुऱया पडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येणार आहेत. खाटा वाढवण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिह्यांतील प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
सामूहिक रोगप्रतिकारशक्ती
लसीकरणाचा वेग लक्षात घेता लवकरच हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) तयार होईल आणि कोरोनाचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
…तर कडक निर्बंध
संसर्ग रोखण्यासाठी शारीरिक अंतर आवश्यक आहे. पण लोक सार्वजनिक ठिकाणी अशीच गर्दी करणार असतील तर निर्बंध कडक करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा दिला. मात्र त्याचवेळेस नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
– सध्याचे निर्बंध कठोर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्याचा अंतिम निर्णय झाल्यावर सांगण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.































































