
गेली पाच दशके आपल्या दमदार अभिनयासह हटके स्टाइलमुळे बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर राज्य गाजवणारे ‘थलायवा’ रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव गायकवाड यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ही घोषणा केली आहे. 2019 या वर्षासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून 3 मे रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱया कलाकाराला दरवर्षी केंद्र सरकारतर्फे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची या पुरस्कारासाठी परीक्षकांनी निवड केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना प्रकाश जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘या पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद होतोय. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक म्हणून रजनीकांत यांचे योगदान मोलाचे आहे. परीक्षकांनी एकमताने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.’
या पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अभिनेते मोहनलाल, विश्वजीत चटर्जी, दिग्दर्शक सुभाष घई, गायक शंकर महादेवन यांनी काम पाहिले.
प्रेक्षकांच्या अनेक पिढय़ांमध्ये लोकप्रिय, वैविध्यपूर्ण भूमिका आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजेच रजनीकांत. थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- देशासह जगभरातून रजनीकांत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सोशल मीडियावरही ‘रजनीकांत’ हा हॅशटॅग दिवसभर ट्रेंडिंगमध्ये होता.
दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्कारासाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्व चाहत्यांचे आणि पेंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या सगळ्यांना मी समर्पित करतो.
निवडणुकीमुळे पुरस्कार? जावडेकर पत्रकारांवर संतापले
तामींळनाडूत निवडणुका आहेत. मोदी सरकारने तामीळनाडूच्या जनतेत फीलगुड निर्माण करण्यासाठीच पुरस्काराचे हे टामयिंग साधले, अशी टीका होत असताना आज पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकरही या प्रश्नावरून पत्रकारांवरच भडकले. तामीळनाडूमध्ये निवडणुका आहेत त्यामुळेच आता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे काय, असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता, हा पुरस्कार चित्रपट सृष्टीशी संबंधित आहे. पाच जणांच्या निवड समितीने रजनीकांत यांच्या सिनेमातल्या योगदानाची दखल घेत, ही निवड एकमताने केली आहे. यात राजकारण कुठून आले, नीट प्रश्न विचारले पाहिजेत, असे त्यांनी सुनावले.




























































