
अमूल कंपनीची शाखा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने वडगाव बुद्रुकमधील एका व्यक्तीला अडीच लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी मिलिंद लक्ष्मण कांबळे (वय 43, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कांबळे हे वाघोली येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ते गुगलवर अमूल कंपनीबाबत शोध घेत होते. त्यानंतर त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून एकाने फोन करून अमूल कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. संबंधिताने त्यांना अमूल कंपनीची शाखा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यामाध्यमातून मोठा नफा मिळवून देतो असे सांगितले. शाखा देण्यासाठी अडीच लाख रूपये द्यावे लागतील असे आरोपीने त्यांना सांगितले.
पैसे भरण्यासाठी एका बँकेचा खाते क्रमांक देखील पाठविला. कांबळे यांनी आरोपीला गुगल पेवरून अडीच लाख रूपये पाठविले. पैसे पाठविल्यानंतर कांबळे यांनी आरोपींशी वारंवार संपर्क केला. पण, त्यांना शाखा मिळाली नाही. नंतर आरोपींशी संपर्क ही झाला नाही. त्यांनी दिलेले पैसे परत दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळे यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी आरोपींचा माग काढला जात आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली.





























































