गुजरातला लॉकडाऊनची गरज, हायकोर्टाने टोचले कान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती बनली आहे. दर दिवशी अडीच ते तीन हजार नवे रुग्ण सापडत आहेत. उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत गुजरात सरकारला वीकेंड कर्फ्यु तसेच तीन-चार दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले आहेत.

गुजरात उच्च न्यायालयात आज कोरोना संदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. राज्यातील मोठय़ा शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारी, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना तातडीने पूर्णपणे मनाई केली पाहिजे असे मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती भार्गव कारिया यांनी सुनावणीवेळी सांगितले.

फेब्रुवारी-मार्चमध्ये महापालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुका झाल्यानंतर गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. राज्य सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करत आहे. त्यानंतरही रुग्णसंख्या सतत वाढत आहे. याबाबतही कोणतीही हलगर्जी करू नका अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

आरोग्य व्यवस्थेची ‘सुरत’ बिघडली

सुरत महानगरपालिकेने चक्क कचऱयाच्या गाडीतून व्हेंटिलेटर्स नेल्याचे फोटो वायरल झाले आहेत. हे व्हेंटिलेटर वलसाड सिव्हिल रुग्णालयातून मागवण्यात आले होते. वलसाडच्या जिल्हाधिकाऱयांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.