मुलांनी मुलांसाठी चालवलेली पत्रमोहीम, ‘लेटर फॉर चेंज’मध्ये देशभरातील मुलांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलं ही देशाचे भविष्य असतात. त्यांचेही काही म्हणणे असते. ते मांडण्यासाठी ‘लेटर फॉर चेंज’ हे अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मोहिमेत देशभरातील मुले जोडली जात असून विविध विषयांवर ते अभिव्यक्त होताना दिसत आहेत. महिका शर्मा या 12 वर्षांच्या मुंबईकर मुलीने ‘लेटर फॉर चेंज’ ही मोहीम सुरू केली आहे.

‘मुलांनी मुलांसाठी चालवलेली पत्रमोहीम’ असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. याबद्दल महिका सांगते, देशभरातून मुले पत्र लिहून मला व्हॉट्सऍपवर पाठवतात. त्यांची छाननी करून ‘लेटर फॉर चेंज’ फाऊंडेशनच्या वेबसाईटवर अपलोड केली जातात. याशिवाय अन्य इंटरनेट माध्यमांवरही शेअर केली जातात. जेणेकरून ती संबंधित प्रशासकीय अधिकाऱयांपर्यंत पोचावी.

दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना आजारांना तोंड द्यावे लागत आहे. दिल्लीत अनेक कुटुंबाकडे स्वतःच्या गाडय़ा आहेत. अशा लोकांनी आठवडय़ातून दोन वेळा सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास केला पाहिजे, असा सल्ला दिल्लीच्या 15 वर्षीय अमित कुमारने दिला आहे. अमितसारख्या अनेक मुलांनी ‘लेटर फॉर चेंज’अंतर्गत आपले म्हणणे मांडले आहे.