
लक्षण नसलेल्या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी न पाठवता त्याचे खोटे अहवाल बनवून रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱयाला चारकोप पोलिसांनी अटक केली. मोहंमद सलीम मोहंमद उमर असे त्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत 37 जणापैकी 19 जणांना कोविड चाचणीचा बनावट अहवाल दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोहंमद हा मालवणी परिसरात राहत असून तो एका खासगी लॅबमध्ये काम करत होता. तो रुग्णाचे नमुने घेताना त्यांना लक्षण विचारत असायचा. लक्षण सौम्य आढळून आल्यास तो त्याचे अहवाल प्रयोगशाळेत पाठवत नसायचा. जुन्या अहवालात फेरबदल करून तो अहवाल रुग्णांना देत असायचा. नुकतेच एका तरुणीने कोविड चाचणीचा बनावट अहवाल दिल्याबाबत चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ निरीक्षक मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, वाघमारे, बाबर, शिंदे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून मोहंमदला मालवणी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने फसवणूक केल्याची पोलिसांना कबुली दिली. गंभीर लक्षण असणाऱया रुग्णाचेच नमुने तो तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवत असायचा. लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या अहवालात फेरबदल करून तपासणीचे एक हजार रुपये तो स्वतः ठेवत असायचा. फसवणूक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी मोहंमदला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
क्यूआर कोडमुळे लटकला
कांदिवली येथे राहणाऱया तरुणीने मोहंमदकडे कोविड चाचणी केली होती. चाचणीनंतर मोहंमदने तिला तिची चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल दिला. तरुणीने तो अहवाल तिच्या वरिष्ठांना सादर केल्यावर त्यांना संशय आला. वरिष्ठांनी रिपोर्टवरील क्यूआर कोड स्कॅन केला असता तो अहवाल दुसऱया रुग्णाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला.




























































