
सामान्य नागरिक व पोलिसांमधले नाते अधिक घट्ट करण्याबरोबर त्यांच्यातील विश्वास आणखी कसा वाढेल यावर माझा भर राहील, असे प्रतिपादन करतानाच पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी कायद्याची पायमल्ली न करता जनतेच्या संरक्षणासाठी कायद्यानुसार काम करावे एवढय़ा सहकार्याची अपेक्षा असल्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
सुबोधकुमार जायस्वाल हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्यापासून राज्याचे पोलीस महासंचालक पद रिक्त आहे. 1986 च्या बॅचचे आणि राज्यात सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेले संजय पांडे यांच्याकडे सरकारने राज्याच्या महासंचालक व महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. त्यानुसार संजय पांडे यांनी शनिवारी सकाळी पोलीस महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतली.
त्यानंतर ‘सामना’शी बोलताना त्यांनी नागरिक आणि पोलिसांमध्ये असलेला विश्वास आणखी वाढवण्यावर भर राहील असे सांगितले. तसेच राज्यात कायद्याची पायमल्ली होऊ नये. पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी कायद्याचे पालन करीत नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपले पोलीस दल मजबूत आहेच, पण यापुढे देखील ते आणखी सक्षमपणे काम करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय पांडे यांनी अॅण्टीकरप्शन ब्युरोचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडून महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला.


























































