हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, बंगळुरूला आस सलग दुसऱया विजयाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये उद्या दोन दाक्षिणात्य संघांमधील लढाई तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ व डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबाद संघ बुधवारी एकमेकांना भिडणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलामीच्या लढतीत गतविजेता मुंबई इंडियन्सला पराभूत करीत या स्पर्धेची सुरुवात दमदार केली. आता विजयी मालिका कायम राखण्यासाठी हा संघ प्रयत्न करील. कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा असेल. याच पार्श्वभूमीवर दोन संघांमध्ये रोमहर्षक लढत होईल यात शंका नाही.

अॅडम झाम्पाला संधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या व्यवस्थापनाने सलामीच्या लढतीत काईल जेमिसन, डॅनियल ख्रिस्तीयन, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल यांची गोलंदाज म्हणून निवड केली. हर्षल पटेल, काईल जेमिसन, मोहम्मद सिराज, डॅनियल ख्रिस्तीयन यांनी या लढतीत आपली चमक दाखवली. युजवेंद्र चहल याला पॉवर प्लेमध्ये मार खावा लागला, पण त्याच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे त्याला बाहेर बसवण्यात येईल असे वाटत नाही. पण लेगस्पिनर अॅडम झाम्पा याला अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राशीद, नटराजन, भुवीकडून अपेक्षा

सनरायझर्स हैदराबादला सलामीच्या लढतीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पण या पराभवाला मागे टाकून डेव्हिड वॉर्नरचा संघ नव्या उमेदीने मैदानात उतरेल यात शंका नाही. भुवनेश्वरकुमार, टी. नटराजन व राशीद खान यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे. तसेच डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे यांना फलंदाजीची बाजू सांभाळावी लागणार आहे. केन विल्यमसन अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

कोहली, एबी अन् मॅक्सवेलवर फलंदाजीची मदार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मदार पुन्हा एकदा स्टार फलंदाजांवर असणार आहे. कर्णधार विराट कोहली, ए बी डिव्हिलीयर्स व ग्लेन मॅक्सवेल या फलंदाजांना पुन्हा एकदा आपला ठसा उमटवावा लागणार आहे. देवदत्त पड्डीकल याने स्थानिक स्पर्धेत धावांचा पाऊस पाडलाय, पण कोरोना संसर्गामुळे त्याला सलामीच्या लढतीत खेळता आले नाही. उद्याच्या लढतीत तो खेळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण त्याला सहभागी होता आले नाही तर वॉशिंग्टन सुंदर विराट कोहलीसोबत सलामीवीराची भूमिका बजावेल.

उभय संघ खालीलप्रमाणे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, फिन अॅलेन, ए बी डिव्हिलीयर्स, पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, अॅडम झाम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमिसन, डॅनियल ख्रिस्तीयन, सुयश प्रभुदेसाई, के. एस. भरत.

सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, विराट सिंग, मनीष पांडे, प्रियम गर्ग, रिद्धीमान साहा, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, जे. सुचीत, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वरकुमार, राशीद खान, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ काwल, बासील थम्पी, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान.

आजची लढत
सनरायझर्स हैदराबाद-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
चेन्नई, रात्री 7.30 वाजता