
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-पीजी) पुढे ढकलली आहे. 18 एप्रिल रोजी ही परीक्षा घेतली जाणार होती.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे. नीट-पीजी परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार असे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सोमवारीच जाहीर केले होते. कोरोना वाढत असताना परीक्षा घेण्याचा आग्रह धरू नये असे सांगत विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी ट्विटरवरून केली होती. विद्यार्थ्यांनी तसे पत्रही मंडळाला दिले होते.


























































