
जर आपल्याला कोरोनाला हरवण्यासाठी खरंच एकजूट दाखवायची असेल तर अमेरिकेने कच्च्या मालावरील निर्यातबंदी हटवावी, अशी विनंती सिरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांना केली आहे. त्यांनी शुक्रवारी यासंदर्भात ट्विट करीत कोरोना प्रतिबंधक लसींच्या उत्पादनात अमेरिकेच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
पुनावाला यांनी थेट राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करीत ट्विट केले. मी अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाच्या वतीने विनंती करतो. जर आपल्याला कोरोनाला हरवण्यासाठी खरंच एकजूट दाखवायची असेल तर अमेरिकेने इतर देशांत कच्च्या मालाची निर्यात करण्यावर घातलेली बंदी हटवावी, जेणेकरून लस उत्पादनाला गती मिळेल. याबाबत तुमच्या प्रशासनाकडे विस्तृत माहिती आहे, असे पुनावाला यांनी म्हटले आहे. कच्च्या मालाच्या पुरवठय़ाबाबत अमेरिकेचे लवचिक धोरण नसल्याबाबत त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
लस उत्पादनाचा वेग मंदावला
सिरम इन्स्टिटय़ूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ही इन्स्टिटय़ूट एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन करीत आहे. इन्स्टिटय़ूटने हिंदुस्थानसह अनेक देशांना लस पुरवली, मात्र सध्या कच्चा मालाचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे लस उत्पादनाचा वेग कमी झाला आहे.




























































