
>> आशुतोष बापट
काही काही भूप्रदेश, गावं ही कायमच एक वेगळं वैशिष्टय़ घेऊन जन्माला आलेली असतात. त्यांचं निराळेपण हे कधी त्यांच्या रचनेमध्ये असतं तर कधी तिथे राहणाऱया माणसांमध्ये असतं. ईश्वरावर असलेला गाढ विश्वास आणि त्याच्याप्रती असलेले अतोनात प्रेम माणसाला किती मानसिक समाधान, स्थैर्य, सुरक्षितता मिळवून देते त्याचे उदाहरण म्हणून ओडिशातल्या सियालिया या अगदी लहानशा खेडय़ाकडे पाहिले की लक्षात येईल. महाराष्ट्रातल्या शनिशिंगणापूर या गावात घरांना दरवाजे नाहीत. गावचे रक्षण साक्षात शनिदेव करत आहेत आणि ते गावात कोणालाही चोरी करू देत नाहीत. कोणी चोरी केली तर ती व्यक्ती आंधळी होते अशी गाढ समजूत असल्यामुळे गावातल्या घरांना दरवाजे लावायची गरजच काय? अशी ही सरळसोपी भावना. अनेक वर्षे जगातले हे केवळ एकमेव उदाहरण असेल असे वाटत होते. परंतु असेच एक गाव ओडिशामध्ये सुद्धा आहे. माणसाच्या श्रद्धांना भौगोलिक सीमा कधीच आडव्या येत नाहीत याचा अगदी पुरेपूर प्रत्यय येतो. इथे शनिदेव नाहीत तर ‘खोखराई ठाकुरानी’ ही गावाची देवी गावचे रक्षण करते अशी भावना. या प्रदेशात देवाला ठाकूर तर देवीला अर्थातच ठाकुरानी म्हणायची पद्धत आहे. कोण आहे ही देवी? आणि कसे करते ती गावचे रक्षण?
भुवनेश्वरपासून पूर्वेला 130 किमी अंतरावर केंद्रपाडा हे जिह्याचे ठिकाण आहे. हा रस्ता पण मोठा सुंदर आणि महामार्ग आहे. या जिह्यातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त 5 कि.मी. वर एक खरेखुरे आश्चर्य सियालिया या गावात दडलेले आहे. सियालिया हे अगदी छोटेखानी खेडे. जेमतेम 70-80 उंबऱयांचे हे गाव. आणि याच गावात असलेले आश्चर्य किंवा वैशिष्टय़ म्हणजे या गावातल्या कोणत्याही घराला दरवाजा नाही. अगदी आपल्या शनिशिंगणापूरसारखे. दरवाजाची चौकट दिसते, परंतु त्याला जी दारे असतात, जी कवाडे असतात ती मात्र अजिबात नाहीत. बाहेरून घरात तुम्ही अगदी सहज डोकावू शकता. कुटीर उद्योग करणारे लोक या गावात राहतात. नुकतेच गावात एक दुमजली घर कोणा धनिक माणसाने बांधले आहे. परंतु त्या घरालासुद्धा दरवाजे नाहीत.
या गावची देवता खोखराई ठकुरानी हिच्यावर गावकऱयांची प्रचंड श्रद्धा. ही ग्रामदेवता प्रत्येकाच्या घराच्या उंबरठय़ावर येऊन बसलेली आहे असे गावकरी समजतात. देवीच जर ऐन उंबरठय़ावर येऊन बसली असेल तर घराला दार कसे लावणार? त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की, जेव्हा ग्रामदेवताच मुळी उंबरठय़ावर येऊन बसली असेल तर चोर घरात प्रवेश करूच शकणार नाहीत आणि म्हणूनच या गावात चोरी होत नाही ही पण अगदी ठाम समजूत ग्रामस्थांची आहे. पूर्वी कधीकाळी कोणी चोरी केली होती तर तो चोर त्या घरातच अडकून पडला. त्याला बाहेर पडायचा मार्ग मिळेना किंवा त्याची मती कुंठीत झाली. त्यांनी चोरीच्या वस्तू परत जागेवर ठेवून दिल्या, देवीची क्षमा मागितली आणि त्यानंतरच तो घराबाहेर येऊ शकला. ही गोष्ट इथे सगळेच जण सांगतात. खोखराई ठाकुरानीचे मंदिर आणि तिची मूर्ती इथे आपल्याला दिसते. नेहमीचे बांधलेले असे मंदिर इथे नाहीच. चारही बाजूंनी या सगळ्या प्रकाराला भिंत बांधली आहे. एका बाजूने आत प्रवेश करायला जागा आहे. समोरच देवीची अंदाजे 3 फूट उंचीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. विविध वस्त्रs आणि हार फुले यांनी देवीची प्रतिमा अगदी झाकून टाकलेली असते. कार्तिकी पौर्णिमेला इथे देवीचा खूप मोठा उत्सव साजरा होत, पण नवरात्रात मात्र इथे कोणताही उत्सव, जत्रा असे साजरे केले जात नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत देवीची काही कडक पथ्ये आहेत. इथे देवीला मांसाचा नैवेद्य कधीही दाखवला जात नाही हे पण एक विशेषच. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ही देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे हा विषय पूर्णपणे बाजूला ठेवून एका वर्षानुवर्षे जपलेल्या परंपरेचा अनुभव इथे येऊन अवश्य घ्यावा. अतिशय स्वच्छ आणि टुमदार असलेल्या या गावात अनेक घरांच्या भिंतींवर चित्रकला केलेली दिसते. ओडिशा हे मला वाटतं कलाकारांनी समृद्ध असं राज्य आहे. खूप खेडेगावातून घराच्या भिंतींवर बाहेरून चित्रकला केलेली दिसते. आपल्याला जे आयुष्य लाभलेलं आहे ते नीटस, आनंदानी, कलेच्या साथीने कसे जगावे हे इथल्या या भोळ्या भाबडय़ा जनतेनी सहजगत्या आत्मसात केलेलं दिसतं.


























































