कचरावेचक महिलेचे शिर पोकलेन मशीनने धडावेगळे झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी कसबा बावडा येथील ‘झूम कचरा प्रकल्पा’वर घडली. सुमारे तीन तासांच्या शोधकार्यानंतर कचऱयातच ते शिर सापडले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.
मंगल राजेंद्र दावणे (वय 60, रा. तिरंगा चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत कचरावेचक महिलेचे नाव आहे. पोकलेनचालक चंद्रकांत अर्जुन माळवी (वय 30, रा. सोनुर्ले, ता. शाहूवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या लाइन बाजार येथील झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात कचरा साचला आहे. हा कचरा एकत्रित करून नव्याने येणाऱया कचऱयासाठी जागा करण्याचे काम नेहमीच सुरू असते. या कामासाठी एका कंपनीला ठेका देण्यात आला आहे. सकाळी कोल्हापूर ग्रीन एनर्जी प्रा. लि.च्या शेडजवळ जुना कचरा बाजूला करण्याचे काम सुरू असताना, कचऱयाच्या ढिगाऱयाजवळच ही कचरावेचक महिला कचऱयातील प्लॅस्टिक आणि बाटल्या गोळा करण्याचे काम करीत होती. पोकलेनचालकाला ही महिला दिसली नाही. त्यामुळे कचऱयाचे ढीग उचलताना त्या महिलेचे शिर पोकलेनच्या बकेटने धडावेगळे झाले.
कचऱयाबरोबर ते इतरत्र पडले. अडकलेले धड बकेटबरोबर वर आल्यानंतर ही बाब लक्षात येताच चालकाने काम थांबवून ही माहिती प्रकल्पस्थळावरील महापालिकेच्या मुकादमास दिली. तातडीने दुसऱया चालकाला बोलावून त्याच पोकलेनने त्या महिलेचे शिर कचऱयाच्या ढिगाऱयातून तब्बल तीन तासांनंतर शोधून काढण्यात आले.































































