
मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया रुग्णाच्या घरी जाऊन पालिकेचे वैद्यकीय पथक आधी तपासणी करणार असून त्यानंतर लक्षणांची तीव्रता पाहून रुग्णाला बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेची 10 जणांची टीम घरी जाऊन रुग्णाची वैद्यकीय तपासणी करणार आहे. या टीमसाठी 10 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. येत्या रविवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.
मुंबईत कोरोना रुग्णांना करण्यात येत असलेल्या बेड वाटपाबाबत अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी हे निर्देश दिले. मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर बेड वितरणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. यानुसार लक्षणे वा तीव्र लक्षणे असणाऱया कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याची मागणी ‘वॉर्ड वॉर रुम’कडे करण्यात आल्यानंतर अशा रुग्णांची महापालिकेच्या वैद्यकीय टिमद्वारे तपासणी केली जाणार आहे. गृहभेटींद्वारे करण्यात येणाऱया या वैद्यकीय तपासणीनंतर अशा रुग्णाला ज्या प्रकारच्या बेडची गरज असेल, त्या प्रकारच्या बेडचे वितरण करण्याचे व्यवस्थापन विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉररुम’द्वारे करण्यात येणार आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या बेडच्या वाटपाचे व्यवस्थापन ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येत आहे. यामध्ये सामान्य बेड, ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेड अशा तीन प्रकारच्या बेडचा प्रामुख्याने समावेश आहे.
विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’कडे येणाऱया दूरध्वनींची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’मधील दूरध्वनी क्रमांकाला 30 हंटिंग लाईनची सुविधा एमटीएनएलकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
गृहभेटींद्वारे करण्यात येणारी रुग्णांची वैद्यकीय तपासणी ही सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत करण्यात येईल तर रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत एखाद्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास अशी तपासणी पालिकेच्या जम्बो कोविड उपचार केंद्रांमध्ये केली जाईल. याचे सर्व व्यवस्थापन ‘वॉर्ड वॉररुम’द्वारेच केले जाणार आहे.





























































