
ऑक्सिजन पातळी खाली आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोणत्याही स्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने प्राणवायू पुरवठय़ासाठी ‘कार्यपद्धती’ निश्चित केली आहे. यामध्ये मध्यवर्ती कक्षाकडे नियंत्रण ठेवून ‘एफडीए’सह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज दिले.
मुंबईला दररोज 235 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. पालिकेला सध्या वाढीव 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणारही आहे. मात्र तोपर्यंत उपलब्ध ऑक्सिजनचा वापर काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. देशभरात सध्या ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे मुंबईत ऑक्सिजन पुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीदास राठोड यांची समन्वयक अधिकारी म्हणून टीम तैनात करण्यात आली आहे.
ऑक्सिजन बेडची सद्यस्थिती
विविध रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये मिळून पालिकेकडे सद्यस्थितीत 10 हजार 773 ऑक्सिजन बेड आहेत. यातील 9 हजार 920 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 853 ऑक्सिजन बेड सद्यस्थितीत रिक्त असल्याची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर दर्शवण्यात आली आहे. मुंबईत सद्यस्थितीत ऑक्सिजन बेडचा तुटवडा नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता सर्व कोविड सेंटर, रुग्णालये, खासगी हॉस्पिटल यांची ‘डेटा शिट’ तयार करून या ठिकाणी उपलब्ध डय़ुरा, जंबो आणि छोटय़ा सिलिंडरची माहिती एकत्र करतील. ही माहिती [email protected] या वेबसाईटवर एकत्र करून पालिकेची मध्यवर्ती यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष यांना अवगत करून देण्यात येईल.
गरजेनुसार 24 तास आधी ऑक्सिजनची मागणी पुरवठादाराकडे करावी. यानंतर 16 तासांत पुरवठा झाला नाही तर संबंधित विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाला संपर्क करतील. यानंतर दोन तासांत पुरवठा झाला नाही तर विभागातील नियंत्रण कक्ष याबाबत अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क करतील. यानंतर पुढील दोन तासात पुरवठा होण्यासाठी कार्यवाही होईल.































































