
बीड जिल्हा रूग्णालयातील कोविड वार्डात पहाटे अचानक ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बंद केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. या गंभीर घटनेने बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बीडच्या जिल्हा रूग्णालयातील वार्ड क्रमांक 7 मध्ये कोरोनाबाधित गंभीर रूग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी गेवराई तालुक्यातील एक आणि पाटोदा तालुक्यातील एक रूग्ण ऑक्सिजन बंद पडल्याने मृत्युमुखी पडले. ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला.
याबाबत स्पष्टीकरण देताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड म्हणाले की, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सिलेंडरचा कॉक अज्ञात व्यक्तीकडून बंद झाल्याने ऑक्सिजन पुरवठा पुढे होवू शकला नाही. जे दोन रूग्ण दगावले आहेत ते अतिगंभीर होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे असे त्यांनी म्हटले.


























































