राज्यातील उद्योगधंद्यांच्या चक्राची गती कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या अर्थचक्राला खीळ बसू नये म्हणून सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांमुळे उद्योगधंद्यांच्या चक्राची गती कायम आहे. कोरोनाचे सर्व नियम पळून 60 टक्के उद्योग सुरु आहेत. त्यामुळेच आजही राज्याची विजेची दैनंदिन मागणी 24 हजार 500 मेगावॅट एवढी नोंदली जात आहे. यावरून कोरोनाचा बंदोबस्त करतानाच अर्थचक्र सुरू ठेवण्याबाबत सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसत आहे.

एप्रिल-मे महिन्यात राज्यातील उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू असताना राज्याची विजेची दैनंदिन मागणी 26-27 हजार मेगावॅटपर्यंत पोहचते. त्यामध्ये मुंबईची 3 हजार मेगावॅट तर मुंबई वगळता राज्याची 24 हजार मेगावॅटच्या जवळपास असते. पण मागील वर्षी कोरोना महामारीच्या सुरुवातीला लावलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे पूर्णपणे बंद होते. त्यामुळे एप्रिलमध्ये विजेची दैनंदिन मागणी 14 हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती.

मात्र यंदा पूर्ण लॉकडाऊन केल्यास उद्योगचक्राबरोबरच अर्थचक्र ठप्प होण्याची भीती होती. त्याची दखल घेत सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱया उद्योगांबरोबरच इतरही उद्योग सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचा उद्योग क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसत आहे.  त्यामुळेच लॉकडाऊन असूनही विजेच्या दैनंदिन मागणीत केवळ तीन हजार मेगावॅटने घट झाली आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये सर्वच उद्योग बंद असल्याने दहा-बारा हजार मेगावॅटने विजेची मागणी घटली होती.

  • महावितरणकडे नोंदली जाणारी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून 7500 मेगावॅट, खासगी वीज प्रकल्पातून 6600 मेगावॅट तर केंद्रीय पॉवर एक्सचेंजमधून 85060 मेगावॅट वीज घेतली जात आहे. तर मुंबईची 2700 मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटाकडून 1200 मेगावॅट, अदानीकडून 500 मेगावॅट तर  केंद्रीय पॉवर एक्सचेंजमधून 1 हजार मेगावॅट वीज घेतली जात आहे.
  • उद्योगधंद्यांचे चक्र सुरू ठेवण्याबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. आज लॉकडाऊन असूनही 60 टक्के उद्योग सुरू आहेत. त्याचा ठोस पुरावा म्हणजे दररोज नोंदली जाणारी 24-25 हजार मेगावॅट विजेची मागणी आहे.
    – अनिल गचके, चेअरमन, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ