
कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसीविर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा तसेच त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपनीने उत्पादनात वाढ करावी, दर्जेदार औषधे रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी उत्पादकांनी प्रयत्नशील रहावे, असेही आवाहन डॉ. शिंगणे यांनी या कंपन्यांना केले आहे.
राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे व त्यावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसीविर या औषधाचा तुटवडा भासत आहे. रेमडेसीविर या औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याचे उत्पादन कसे वाढवता येईल या अनुषंगाने डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी तारापूर एमआयडीसीतील मे. कमला लाईफ सायन्सेस या उसनवारी परवान्यावर काम करणाऱ्या कंपनीस भेट दिली व कंपनीच्या उत्पादन क्षमतेचा व प्रत्यक्ष होत असलेल्या उत्पादनाचा आढावा घेतला.
कंपनी दर दिवशी 35000 रेमडेसीविर व्हायल्सची निर्मिती करत असून कंपनीने आतापर्यंत 6 लाख व्हायल्सची निर्मिती केली आहे, त्यातील 4 लाख व्हायल्स सिप्ला कंपनीस दिल्या व सुमारे 2 लाख व्हायल्स पॅकिंगच्या प्रक्रियेत आहेत, असे कंपनीचे चेअरमन डॉ. झंवर यांनी सांगितले. या कंपनीची रेमडेसीविर लिक्विड इंजेक्शन व लियोफिलाइज्ड इंजेक्शन निर्माण करण्याची एकत्रित क्षमता 2 लाख व्हायल्स दर दिवस इतकी आहे. मे. कमला लाईफ सायन्सेस ही इंजेक्शन निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असून, ती त्यांच्या क्षमतेच्या 10 टक्के उत्पादन सिपलासाठी करते व उर्वरित इतर औषधाचे उत्पादनासाठी इतर कंपन्यासाठी करते. कंपनी जुबिलेंट, हेटेरो, डॉ. रेड्डीज यांच्यासाठीही रेमडेसीविर इंजेक्शन उत्पादन करणार असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले.
सिप्ला कंपनीच्या रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लागणारा एपीआय (Active pharmaceutical ingredients)त्यांच्याकडे असून ते लिक्विड इंजेक्शनच्या 35000 च्या 3 बॅचेस व लियोफिलाइज्ड इंजेक्शनची एक बॅच तयार करू शकतात. उत्पादनासाठीचा सहाय्यक घटक Betadex आयात केला जातो, त्याची कमतरता असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास अधिक उत्पादन करता येईल व रेमडेसीविरचा तुटवडा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर डॉ. शिंगणे यांनी तारापूर एमआयडीसी येथील मे. नेप्रड प्रा. ली. या कंपनीस भेट दिली. ही कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीसाठी रेमडीसीविर इंजेक्शन (lyophilized) उसनवार परवान्यावर निर्माण करते. त्यांची पहिली बॅच 12 मे, 2021 रोजी बाजारात येईल. त्यांची रेमडीसीविर लियोफिलाइज्ड इंजेक्शन निर्माण करण्याची क्षमता 15000 व्हायल्स प्रतिदिन व लिक्विड इंजेक्शनची क्षमता 12000 व्हायल्स प्रतिदिन आहे.
लियोफिलाइज्ड इंजेक्शनच्या पहिल्या बॅचच्या 4 दिवसानंतर दुसरी बॅच घेता येते . स्टेरेलिटी टेस्टिंगसाठी 14 दिवस लागतात. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत टेस्टिंगची परवानगी मिळाल्यास टेस्टिंग 2 दिवसात करता येईल व 6 दिवसात बॅच रिलीज होईल. तसेच लिक्विड इंजेक्शनची बॅच दररोज उत्पादन करुन चाचणी हैद्राबाद येथे केल्यास तिसऱ्या दिवशी बॅच रिलीज करता येईल, अशा प्रकारे राज्यात रेमडेसीविर चे उत्पादन वाढविता येईल व मागणी पूर्ण करता येईल, असेही दोन्ही उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले. या भेटीत शासन व अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी दिले आहे.





























































