मुंबईच्या बारबालांची पुण्यात छमछम; पोलिसांचा लबडे फार्महाउसवर छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही मुंबईतील बारबालांनी पुण्यातील कुडजे गावातील लबडे फार्महाउसवर महानगरपालिकेच्या ठेकेदारासोबत मद्यधुंद पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मद्यधुंद पार्टीचे आयोजन करणाऱ्यांसहित 9 जणांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय पाच मुलींची सुटका करण्यात आली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनमध्ये नागरिकांकडून खबरदारी घेण्यात आली असताना, संबंधित एैयाशांनी नियमावली वेशीवर टांगून मद्यपान करीत डांगडिंग केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मंगेश राजेंद्र शहाणे (वय ३२, रा. अरण्येश्वर), निखील सुनील पवार (वय 32 रा. पर्वती दर्शन), ध्वनीत समीर राजपूत (वय 25, रा. सातारा रस्ता), सुजीत किरण आंबवले (वय 34, रा. सातारा रस्ता), निलेश उत्तमराव बोधे (वय 29, रा. पुरंदर हौ. सोसायटी म्हाडा कॉलनी), आदित्य संजय मदने (वय 24, अंधेरी पुर्व, मुंबई), समीर उर्फ नीकेश दिलीप पायगुडे (वय 39, रा. कुडजेगाव, हवेली), विवेकानंद विष्णू बडे (वय 42, रा. नवी सांगवी, पुणे), प्राजक्ता मुकूंद जाधव (वय 26, रा. सांताक्रूझ पुर्व, मुंबई )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कुडजे गावातील लबडे फार्म हाउसवर बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मद्यधुंद पार्टी सुरू असल्याची माहिती उत्तमगनर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून पाहणी केली असता, डीजे सिस्टिमवर मद्यधुंद तरूणी ठेकेदारांसोबत नाचत असल्याचे दिसून आले. फार्महाउसची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी तेथून दारूच्या बाटल्या, डीजे सिस्टिीम, रोख रक्कम जप्त करीत ९ जणांना ताब्यात घेतले. त्याशिवाय पार्टीचे आयोजन करणाऱ्या समीर उर्फ निकेत पायगुडे आणि विवेकानंद बडे यांनाही ताब्यात घेतले. संचारबंदी लागू असतानाही पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आले. त्यामध्ये एका मध्यस्थी महिलेचाही समावेश आहे. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, शिवाजी दबडे, अमोल भिसे, धनंजय बिटले, किरण पाटील, संभाजी कोंडावळे, रेश्मा वरपे यांच्या पथकाने केली.

असे केले पार्टीचे आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू असतानाही फार्म व्यवस्थापक समीर उर्फ निकेश पायगुडे आणि विवेकानंद बडे यांनी पार्टीचे आयोजन केले. त्याशिवाय डान्सर मुलींना मुंबईतून पुण्यात घेउन येण्यासाठी प्राजक्ता जाधव यांनी मदत केली.त्यांना न्यायालयाने 3 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

”लॉकडाउनमध्ये संचारबंदी सुरू असतानाही लबडे फार्महाउसवर मद्यधुंद पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी छापा टाकून पार्टी आयोजकासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे.” – वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे