
पुणे शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रामटेकडी हडपसर परिसरात अटक केली. त्याच्याकडून 5 लाख 3 हजार रुपये किंमतीचे 71 ग्रॅम 990 मिलीग्रॅम ब्राउनशुगर आणि 10 हजारांचा मोबाईल असा 5 लाख 13 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. महादेव घुमरे (वय 38,रा.रामनगर, रामटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शखेने अंमली पदार्थ तस्करांचा बिमोड करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. गुरूवारी दुपारी पथक रामटेकडी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी गॅरेज समोरील रोडवर एकजण अंमली पदार्थ घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, सुजित वाडेकर, मारुती पारधी, पांडुरंग पवा, राहुल जोशी, संदिप जाधव, मनोज साळुवे, संदेश काकडे, विशाल दळवी, विशाल शिंदे, योगेश मोहित, रुबी आब्राहम आणि रेहाना शेख यांच्या पथकाने केली.

























































