
महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यावर टाकली आहे. या वयोगटातील 6 कोटी नागरिक महाराष्ट्रात आहेत. प्रत्येकाला दोन डोस याप्रमाणे 12 कोटी डोसची आवश्यकता असून हे 12 कोटी डोस एकरकमी… एका चेकने घेण्याची महाराष्ट्राची ताकद आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम जनतेला आश्वस्त केले.
आर्थिक चणचण असली तरी नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाला लस देऊन सुरक्षित करणारच. हे माझे वचन आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर लवकरात लवकर मात केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद सधला. यावेळी राज्यातील लादण्यात आलेले कडक निर्बंध, तिसरी लाट रोखण्यासाठी राज्याची तयारी, त्याचप्रमाणे 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासंदर्भात राज्य सरकारकडून उचलल्या जाणाऱया पावलांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला माहिती देतानाच संयम ठेवण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांवर 18 ते 14 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी टाकली आहे. काहींचा समज आहे की या लस आपल्याला केंद्राकडून मोफत मिळणार आहेत. मात्र त्यांनी याविषयी माहिती घेण्याची गरज आहे. तरीही केंद्र सरकारने टाकलेली ही जबाबदारी पेलण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. आज जर आपल्याला 12 कोटी डोस कुणी देणार असेल तर ती रक्कम एकरकमी देऊन ते डोस घेण्याची आपली तयारी आहे. पण या लसीच्या पुरवठय़ाला मर्यादा आहेत. सिरम आणि भारत बायोटेकशी आपण बोलत आहोत. मे महिन्यात आपल्याला 18 लाखांच्या आसपास लसीचे डोस 18 ते 44 वर्गासाठी मिळणार आहेत. या लसीकरणासाठी केंद्र सरकारने राज्यांना स्वतंत्र अॅप सुरू करण्याची परवानगी द्यावी पिंवा राज्यांसाठी अॅप तयार करून ते कोविनला जोडावेत, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
लसीचा पुरवठा वाढेल, तसतशी दिली जाईल, गोंधळ करू नका!
सर्व वयोगटातल्या नागरिकांना लसीकरणाची सोय आपण करतो आहोत. ही लसीकरण केंद्रे कोरोना प्रसारक केंद्रे होऊ नयेत, अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे हात जोडून विनंती करतो की गर्दी करू नका. आपल्याकडे 18 ते 44 वयोगटासाठी सध्या 3 लाख लसी आल्या आहेत. हे प्रमाण अत्यल्प आहे. आपल्याला दीड-दोन कोटी डोस महिन्याचे मिळाले, तर आपण दिवस-रात्र मेहनत करू आणि सर्वांना लस देऊ, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
…तर 10 लाख सक्रिय रुग्ण आढळले असते
बंधनाचा आपल्याला नेमका काय उपयोग झाला? रुग्ण संख्या ओसरली नसली तरी जी काही रुग्ण संख्या स्थिरावली आहे. निर्बंध लावण्याच्या आधी ज्या पटीने रुग्ण वाढ होत होती. ती रुग्णवाढ तशीच होत राहिली असती तर आजच्या दिवशी नऊ ते दहा लाख रुग्ण सक्रिय असते, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांचे आभार मानले. तुमच्यावर बंधने घालताना मलाही जड जात होते. पण मी सांगितले आणि आपण नेहमीप्रमाणे तुम्ही माझे ऐकले. त्यामुळे रुग्ण संख्या साधारण सहा ते साडेसहा लाखांपर्यंत स्थिरावली आहे. अजूनही रुग्णवाढ उताराला लागलेली नाही. पण वाढ थांबवली आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या खदखदत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. आज आपण दाखवलेला संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची अवस्था काय झाली असती याची कल्पना नको, विचार नको. ही बंधने अजूनही आपल्याला अजून पाळावी लागणार आहेत. ही बंधन लावणे सोपे आहे. पण पाळणे कठीण आहे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
ऑक्सिजन कमी पडू देणार नाही!
आपल्या राज्याची ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता ही साधारणपणे 1 हजार 200 मेट्रिक टन आहे. आज आपण 1 हजार 700 मेट्रिक टनच्या आसपास ऑक्सिजन वापरत आहोत. केंद्राने आपल्याला 500 मेट्रिक टन इतर राज्यांकडून ऑक्सिजन आणण्याचा कोटा ठरवून दिला आहे. बाहेरून मिळणाऱया ऑक्सिजनचे आपण पैसे देत आहोत आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी त्याचेही वेळेवर पैसे देऊन आपल्या राज्यात वेळेवर ऑक्सिजन पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. मात्र रुग्णवाढ अधिक झाली तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. पण सुदैवाने रुग्णसंख्या स्थिरावली आहे. येत्या काही दिवसांत नवीन ऑक्सिजन प्लांट सुरू होतील. कोविडची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजन कमी पडू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
जिथे ऑक्सिजन उपलब्ध तिथे कोरोना सेंटर
त्यासोबत लिक्विड ऑक्सिजनची ने-आण शक्य असते, पण गॅस ऑक्सिजनची वाहतूक शक्य नसते. मग जिथे गॅस ऑक्सिजन असेल, तिथे आपण कोविड सेंटर उभारतो आहोत. त्यामुळे ऑक्सिजन रुग्णापर्यंत नेणं शक्य नसेल, तर रुग्णाला ऑक्सिजनपर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. मोठया प्रमाणावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. राज्य सरकार आपल्या खर्चाने 275 पीएसए ऑक्सिजन प्लांट लावत आहे. येत्या काही दिवसांत ते कार्यान्वित होतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर नको
ऑक्सिजनप्रमाणेच परिस्थिती रेमडेसिवीरच्या बाबतीत आहे. एकदम मागणी वाढली आहे. सर्वांना रेमडेसिवीर पाहिजे. पण रोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासते. केंद्राकडून आपल्याला आज साधारणपणे 35 हजारांच्या आसपास इंजेक्शन मिळत आहेत. त्याचेही आपण पैसे देत आहोत. मात्र कोविड सेंटर्समधील डॉक्टरांना, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही सांगतो की, जागतिक आरोग्य संघटना व राज्याच्या टास्क पर्ह्सने व केंद्राने सावधानतेचा इशारा दिला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर करू नका. गरज नसताना आणि जरुरीपेक्षा जास्त दिले तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले.
यंत्रणांवर ताण, दुर्घटना टाळा!
गेले वर्षभर आरोग्य यंत्रणा आपली एक क्षणसुद्धा उसंत न घेता सुरू आहेत. त्यामुळे यंत्रणांवर अणखी किती ताण देणार. किती ताण सहन करणार. गेल्या काही दिवसांमध्ये काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. नाशिक, विरार अशा दुर्घटना घडताना दिसत आहेत. मग जिवावर उदार होऊन डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय असे आपले कर्मचारी हताश होतात. नाशिक दुर्घटनेनंतर मी तिथल्या कर्मचाऱयांशी झूमवर बोललो. काहीजण माझ्याशी बोलतानाच रडायला लागले. दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातल्या सगळ्या जम्बो कोविड सेंटर्सचं स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याचे निर्देश मी दिले आहेत. ज्या दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, त्या टाळण्याचा प्रयत्न करा.
आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लादण्यात आलेल्या कडक निर्बंधाबाबत म्हणाले, राज्यात आपण लॉकडाऊनसारखी बंधने घातली, मग आपण नेमके काय केले असा प्रश्न विचारला जात आहे. कालच मुंबई उच्च न्यायालयाने अॅडव्होकेट जनरलना प्रश्न विचारला की, जी काही बंधने लावली आहेत, त्यापेक्षा गेल्या वर्षीप्रमाणे कडक बंधने लावण्याची गरज आहे का? पण याबाबत तुम्ही मला विचाराल तर याहून कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता वाटत असली तरी तशी वेळ येणार नाही. कारण महाराष्ट्रातील माता-भगिनी व तमाम बांधव समजुतदारपणा दाखवत आहेत. हिंमत जिद्द दाखवत आहेत. संयम दाखवत आहेत.
लॉकडाऊन म्हणून हात लॉक करून बसलो नाही!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य व्यवस्था कशी सुसज्ज आहे याचा दाखलाच दिला. ते म्हणाले, गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला तेव्हा आपल्या राज्यात फक्त दोन चाचणी करण्याच्या प्रयोगशाळा होत्या. सध्याच्या घडीला राज्यात 609 प्रयोगशाळा आहेत. मागील वर्षीच्या 80 ते 85 हजारांवरून आपण आता रोज दोन ते अडीच लाखांच्या आसपास चाचण्या करीत आहोत. आता तीन लाखांवरती नेणार आहोत. लॉकडाऊन करून हात पण लॉक करून बसलो नाही. हातपाय हालवत आहोत. असा टोला विरोधकांना लगावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काय काय सुविधा करण्यात आल्या याची माहिती दिली. प्रयोगशाळांसोबत जम्बो कोविड सेंटरही वाढवली आहेत. फिल्ड हॉस्पिटल केली. आपत्कालीन हॉस्पिटलची उभारणी केली. काही ठिकाणी हॉटेलमध्ये कोरोना केंद्रे निर्माण केली. जूनमध्ये 2 हजार 665 कोविड सेंटर होती. आता साडेपाच हजारांच्या आसपास कोविड सेंटर आहेत. रुग्ण शय्या दोन लाख तीस हजार होत्या. आता चार लाख 31 हजार आहेत. त्यात आखणी वाढ करणार आहोत. जूनमध्ये 42 हजार 800 ऑक्सिजन खाटा होत्या. आता 86 हजारांच्या आसपास ऑक्सिजन खाटा आहेत. गेल्या जूनमध्ये आयसीयू बेड 11 हजार 882 होते. आता 28 हजार 937 आयसीयू बेड आहेत. व्हेंटिलेटर केंद्राने दिले होते. त्यातील काही दुरुस्त व नादुरुस्त असे गृहित धरले तरी गेल्या वर्षी 2020 जूनमध्ये साधारणपणे 3 हजार 744 व्हेंटिलेटर होते. आता 11 हजार 713 व्हेंटिलेटर आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजची अंमलबजावणी सुरू
दुर्बल घटकांना निर्बंधांच्या काळात मदत देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले होते. त्याची काटेकोपरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दुर्बल घटकातील कुटुंबांतील 7 कोटी नागरिकांना प्रती व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याअंतर्गत आतापर्यंत 6248 मेट्रिक टन गहू आणि 4817 मेट्रिक टन तांदूळ देण्यात आले. शिवभोजन थाळीचा आतापर्यंत 15 लाखांहून अधिक गरजूंनी लाभ घेतला.
संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृध्दापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या योजनांतर्गत 35 लाख लाभार्थींना एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी 1428.50 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. नोंदणीकृत 13 लाख बांधकाम कामगारांपैकी 9 लाख 17 हजार कामगारांच्या खात्यात एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी 1500 रुपये देण्यात आले.
1 लाख 5 हजार घरेलू कामगारांना 15 कोटी 82 लाख 50 हजार निधी वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फेरीवाले कामगारांना 61.75 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. रिक्षाचालकांना एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी 1500 रुपये देण्याची कार्यवाही सुरू होत आहे. आदिवासी खावटी योजनेंतर्गत 11 लाख कुटुंबांना प्रत्येक 2 हजार रुपये मदत देण्याची कार्यवाहीही सुरू आहे. रुग्णांसाठी सुविधा उभारणे व औषध खरेदीसाठी जिल्हाधिकाऱयांना 3300 कोटी रुपये डीपीडीसीतून 1100 कोटी रुपये वितरीत झालेत.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे –
गेल्या वर्षी1 मे रोजी लॉकडाऊनच होता. या वर्षी कडक निर्बंध आहेत. हे काय दुष्टचक्र मागे लागलंय ते कळत नाही! उच्च न्यायालयाने पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. परंतु महाराष्ट्राची जनता समजूतदारपणे वागत आहे. त्यामुळे याहून कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता मला वाटत नाही!
काहीजण लॉकडाऊन लावू नका अशी ओरड करताहेत, पण आपण कडक निर्बंध लादले नसते तर इतर राज्यांसारखी आपलीही अवस्था झाली असती.
राज्यात काही ठिकाणी ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू केले आहे.
जून–जुलैपर्यंत ऑक्सिजनच्या तुटवडय़ावर आपण मात करू.
पुढील दोन महिने शिवभोजन थाळी मोफत देणार.
दुसरी लाट थोपवूच, तिसरी लाट आलीच तर समर्थपणे मुकाबला करू.
ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्णांना सुविधा
आणि गोरगरीबांच्या हाती मदत यात
काहीही कमी पडू देणार नाही.
गोंधळ नको, घाई नको; महाविकास आघाडी सरकार प्रत्येकाचे लसीकरण करणारच.
काहीजणांनी याही परिस्थितीत लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, पण मला तूर्त राजकीय बोलायचं नाही. त्याचं उत्तर मी जाहीर सभेत देईन, पण सध्या जाहीर सभा घेण्याची वेळ नाही. वेळ येईल तेव्हा मी ठोकून काढेनच.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात गिरणी कामगार व कामगार वर्ग उतरला होता. त्यांनी जर लढा दिला नसता तर मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती. म्हणून शेतकरी व कामगार या दोघांचेही अत्यंत मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांचे स्मरण करून मी त्या वीरांना मानाचा मुजरा करतो.
कोरोनाविरोधातील संघर्षाचा हाही काळ जाईल
2010 मध्ये संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्षे झाली तो सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दिन वांद्रे-कुर्ला संकुलात लाखो लोकांनी अनुभवला. स्वतः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची उपस्थिती होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गाण्यातून पहिल्या संयुक्त महाराष्ट्र दिनाची आठवण जागवली. तो सुवर्ण महोत्सव आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. ठीक आहे. कोरोनाविरोधीतील संघर्षाचा हाही काळ जाईल आणि तो सुवर्ण दिन सोन्याच्या झळाळीने साजरा करू, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.






























































