
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची सोमवारी धन्वंतरी रूपातील पूजा करून जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर करावे, अशी प्रार्थना करण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या विविध रूपातील पूजा करण्यात येतात. तुळजाभवानी देवीच्या पूजा करताना देवीच्या मस्तकी हळदी, कुंकुवाने विविध प्रकारची चिन्हे काढले जातात. यात कधी ओम, श्री, कमळ, त्रिशूळ, स्वस्तिक, सूर्य, शंख, मोरा अशा विविध प्रतिमा काढल्या जातात. या पूजा देवीचे महंत, पुजारी करतात. दिवसातून दोन वेळा ही पूजा करण्यात येते.
सध्या जगावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोना रुग्णाची संख्या तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. या संकटातून मानवाला बाहेर काढण्यासाठी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची सोमवारी धन्वंतरी रूपातील पूजा करण्यात आली. या पूजेमध्ये हळदी, कुंकवाच्या सहाय्याने देवीच्या कपाळावर डॉक्टरांचे चिन्ह साकारण्यात आले होते. मात्र, सध्या मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांनी तुळजाभवानीचे ऑनलाईन दर्शन घेतले.


























































