
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसऱयांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 5 मे रोजी राजभवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून द्रमुक नेते एम.के. स्टॅलीन 7 मे रोजी शपथ घेणार आहेत.
बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत यश मिळवत आपली सत्ता राखली आहे. तृणमुलच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी एकमताने ममता बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीनंतर तृणमूल काँग्रेस सरचिटणीस आणि राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनी 5 मे रोजी ममता बॅनर्जी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य या दिवशी शपथ घेतील.
तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते आणि माजी मुख्य मंत्री एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलीन यांनी बहुमत मिळवत द्रमुकचे प्रमुख आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले. एम.के. स्टॅलीन 7 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.





























































