
राज्यातील ऑक्सिजनची वाढती गरज आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेची दखल घेत महानिर्मितीने ‘मिशन ऑक्सिजन’ हाती घेतले आहे. अंबाजोगाई येथे यशस्वीपणे ऑक्सिजन निर्मिती सुरू केल्यानंतर आता कोराडी, खापरखेडा, पारस आणि परळी औष्णिक वीज केंद्राच्या ओझोनायझेशन प्लांटमध्ये आवश्यक बदल करून प्रतितास 566 घनमीटर क्षमतेने दैनंदिन 1456 जम्बो सिलिंडर भरतील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्राणवायू निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले कॉम्प्रेसर, फिल्टर व इतर यंत्रसामग्री आयात केली जाणार असून त्यासाठी 18 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महानिर्मितीने आपल्या औष्णिक वीज प्रकल्पात वापरल्या जाणाऱया पाण्यात शेवळ व इतर सूक्ष्मजंतू वाढू नयेत म्हणून त्या पाण्यावर रासायनिक अभिक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट उभारले आहेत. त्यामध्ये आवश्यक बदल करून ऑक्सिजन निर्मिती करता येत असल्याचे अंबाजोगाई येथील पायलट प्रोजेक्टवरून स्पष्ट झाले आहे.





























































