
>> मल्हार कृष्ण गोखले
मानवी जीवनात मृत्यू ही घटना अटळच असते. एखादा माणूस मरण पावतो. तो जर समाजात प्रसिद्ध असेल तर तो बातमीचा विषय होतो. त्याची समाजातली किंवा एकंदर सार्वजनिक जीवनातील प्रसिद्धी जशी आणि जितकी लहानमोठी असेल तितकी त्याच्या मृत्यूलाही कमीअधिक प्रसिद्ध मिळते. नुसती बातमी, स्फूट लेख, विशेष मृत्युलेख, वृत्तपत्रांच्या रविवार पुरवणीत बऱयाचशा छायाचित्रांसह स्मरणलेख; हल्ली इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये, मृतांच्या चार-दोन जवळच्या लोकांनी एका सूत्रसंचालकासोबत प्रश्नोत्तरे करीत मृतांच्या आठवणी जागवणे, असे विविध प्रकार रूढ आहेत.
वृत्तपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमे समाजात सर्वत्र पोहोचतात ही जशी त्यांची शक्ती आहे, तशी जागा आणि वेळ कमी असणे, ही त्यांची मर्यादासुद्धा आहे. वृत्तपत्रातली जागा आणि दूरदर्शन वाहिनीवरचा जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा वेळ, या मर्यादेत अनेकदा मृत व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व मावत नाही. परिणाम असा होतो की, समाजाला त्या माणसाची एक वरवरची, सर्वसाधारण माहिती कळते. तेवढी पुरेशी असेल तर ठीकच.
पण अनेकदा असे घडते की, त्या वरवरच्या माहितीतून त्या माणसाचे खरे व्यक्तिमत्त्व आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या जीवनात केलेले कार्य लोकांना कळतच नाही. अशा वेळी साप्ताहिके, मासिके आणि दिवाळी अंकांचे संपादक यांची ही एकप्रकारे जबाबदारी असते की, मृत माणसाच्या निकटच्या एखाद्या माणसाकडून त्याच्या कार्याबद्दल साक्षेपाने विवेचन करणारा विस्तृत स्मरणलेख लिहवून घेणे. दैनिक वृत्तपत्रांपेक्षा साप्ताहिके, मासिके आणि दिवाळी अंक अशा विवेचक लेखांकरिता अधिक जागा उपलब्ध करू शकतात. अनेकदा तर असे घडते की, असे विवेचक लेख आल्यानंतरच वाचकांना म्हणजेच पर्यायाने समाजाला भान येते की, अमुक एका माणसाच्या मृत्यूने आपण काय गमावले आहे ते. आणि त्यातून एखाद्याला तरी तसेच काहीतरी मौलिक कार्य उभे करण्याची प्रेरणा मिळते.
प्रस्तुत ‘पैलतटावर’ या संग्रहात असे विस्तृत विवेचक तेरा स्मरणलेख आहेत. ही तेराही मृत माणसे साहित्य, समीक्षा आणि इतिहास अशा वाङ्मयीन क्षेत्रातली आहेत. अनुक्रमे म. वि. गोखले, अनुराधा पोतदार, म. द. हातकणंगलेकर, शंकर वैद्य, द. भि. कुलकर्णी, रा. ग. जाधव, दिगंबर पाध्ये, वि. मा. प्रभुदेसाई, के. ज. पुरोहित, ल. रा. नसिराबादकर, सु. रा. चुनेकर, गो. मा. पवार आणि जे. व्ही. नाईक या साहित्यिक, लेखक, कवी, समीक्षक, कोशकार, सूचिकार आणि इतिहासकार व्यक्तींबद्दलचे हे लेख आहेत. लेखक प्रा. डॉ. विलास खोले हे स्वतः विद्वान लेखक तर आहेतच, पण वरील तेराही व्यक्तींशी त्यांचे अनेक वर्षांपासूनचे व्यक्तिगत स्नेहाचे संबंध होते. या मृत व्यक्तींबरोबर त्यांच्या नियमितपणे होणाऱया गाठीभेटी, वाङ्मयीन चर्चा, संवाद, दूरध्वनीवरील दीर्घ संभाषणे यातून आपले बौद्धिक जीवन आणि भावजीवनही समृद्ध होत होते, असा लेखकाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचे जाणे म्हणजेच आपल्या जगण्याचा एक कप्पाच बंद होणे, एक रिक्तपणा जाणवणे, असाही लेखकाचा अनुभव आहे. त्या भावोत्कट मनःस्थितीत, पण भावनेत वाहून न जाता, लेखकाने अत्यंत जाणकारीने वाचकांसमोर त्या मृताचे एक सुंदर व्यक्तिचित्रच उभे केले आहे. एरवी व्यक्तिचित्र लेखनात साधारणपणे व्यक्तिमत्त्व उभे राहते, पण कार्य उभे राहतेच असे नव्हे. विलास खोले यांच्या या स्मरणलेखांमध्ये त्या-त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य दोन्ही अतिशय जिव्हाळय़ाने आणि साक्षेपाने उभे राहिले आहे.
एकंदरीत लेखसंग्रह अत्यंत वाचनीय. स्मरणलेख कसे असावेत याचा उत्कृष्ट नमुनाच. सतीश भावसार यांच्या देखण्या मुखपृष्ठ, मांडणीसह मॅजेस्टिकची सुबक निर्मिती.
पैलतटावर
लेखक ः विलास खोले
प्रकाशक ः मॅजेस्टिक प्रकाशन
पृष्ठs ः 202, मूल्य ः रुपये 250/-





























































